नाशिक : विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसात मोठी तफावत दिसून येत आहे. मुसळधार पावसासाठी ओळखल्या जाणाऱ्या सातपुडा पर्वतराजीतील नंदुरबारमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी, तर अवर्षणप्रवण अहिल्यानगरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नाशिक, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. नाशिक विभागातील ५४ पैकी ३४ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली आहे.
नाशिक विभागात १ जून ते ३ ऑगस्टदरम्यान ३७७.३ मिलीमीटर सरासरीच्या तुलनेत ३६८.० मिलीमीटर, म्हणजेच ९७.५ टक्के पाऊस झाला. जून महिन्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी होते. जुलैमध्ये मात्र ही कसर भरून निघाली. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत ५३१.३ मिलीमीटर (१०४.४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात २४०.३ मिलीमीटर (१११.८ टक्के), धुळे जिल्ह्यात ३४५.७ मिलीमीटर (११३.२ टक्के) आणि जळगाव जिल्ह्यात ३८९.५ मिलीमीटर (११७.४ टक्के) पाऊस झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात मात्र आतापर्यंत २६३.७ मिलीमीटर (५४.३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.
१० तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस
नाशिक विभागातील ५४ तालुक्यांपैकी ३४ तालुक्यांमध्ये अपेक्षित सरासरीच्या १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील १२, जळगाव जिल्ह्यातील १०, अहिल्यानगर जिल्ह्यातील आठ आणि धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यांचा समावेश आहे. विभागातील १० तालुक्यांमध्ये ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान पाऊस झाला. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, यावल, जामनेर, बोदवड आणि जळगाव, नाशिक जिल्ह्यातील पेठ व येवला, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता व नेवासा तसेच नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याचा समावेश आहे. उर्वरित १० तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. विभागात सर्वात कमी पाऊस झालेल्या तालुक्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा (३७.१ टक्के), अक्राणी (४०.८ टक्के), नंदुरबार (४६.९ टक्के), शहादा (४७.६ टक्के) आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (४८.२ टक्के) यांचा समावेश आहे.
इगतपुरीत केवळ ५० टक्के पाऊस
नाशिक विभागात सर्वाधिक पावसासाठी इगतपुरी तालुका ओळखला जातो. या तालुक्यात १,७३६ मिमी पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ ५० टक्के पाऊस झाला आहे. तर लगतच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सरासरी २६६ मिमी पावसाच्या तुलनेत तब्बल २०२ टक्के पाऊस झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सरासरी ४४३ मिमी पावसाच्या तुलनेत केवळ ३७ टक्के पाऊस झाला आहे. संगमनेर तालुक्यात १७१ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत १२३ टक्के पाऊस झाला आहे. या आकडेवारीवरून यंदाच्या हंगामात घाटमाथ्याऐवजी सपाट आणि पावसाच्या सावलीच्या प्रदेशात अधिक पाऊस झाल्याचे अधोरेखित होत आहे.
