नाशिक : दिवाळी म्हटली की घराघरांत फराळाचा सुगंध, चकल्या, करंज्या, लाडू, चिवडा आणि शंकरपाळे बनवण्याची लगबग सुरू होते. पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी फराळ तयार करण्याची परंपरा आजही कायम असली, तरी बदलती जीवनशैली, वेळेची कमतरता आणि वाढती महागाई यामुळे आता तयार फराळाला पसंती मिळू लागली आहे. दिवाळीच्या साफसफाईपासून सजावट, खरेदी, पाहुण्यांचे स्वागत आणि इतर कामांपर्यंत महिलांची होणारी धावपळ आणि वाढलेली महागाई यामुळे फराळाचे गणित बिघडत आहे. परिणामी, तयार फराळाकडे महिलांचा कल वाढत आहे.
दिवाळी आणि फराळ हे समीकरण कालातीत आहे. दिवाळीची सुरुवात घरातील साफसफाईने होत असली, तरी दिवाळीत रंगत येते ती खुसखुशीत फराळाने. चकल्या, करंज्या, अनारसे, लाडू, चिवडा अशा पदार्थांची यादी मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबत असते. मात्र, प्रत्यक्षात पदार्थ तयार करण्याची पूर्वतयारी ते पदार्थ बनविण्यापर्यंत बराच वेळ द्यावा लागतो. पीठ मळणे, सारण तयार करणे, तळणी, भाजणी आणि पदार्थ साठविण्याची व्यवस्था या सगळ्या प्रक्रिया वेळखाऊ आहेत. नोकरी, व्यवसाय आणि घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांसाठी दिवाळीचा फराळ तयार करणे हे मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे घरच्या घरी काही मोजके पदार्थ तयार करून उर्वरित फराळ विकत घेण्याचा पर्याय अनेक कुटुंबांकडून स्वीकारला जात आहे.
विशेष म्हणजे, मागील काही वर्षांत तयार फराळाच्या बाजारपेठेतही मोठे वैविध्य पाहायला मिळत आहे. पारंपरिक चकली, करंजी, चिवडा, लाडू, शंकरपाळे यांसोबतच ड्रायफ्रूट लाडू, खजूर रोल, विविध प्रकारच्या कचोरी, भाजलेली चकली, नाचणीचे पदार्थ, मल्टिग्रेन चिवडा, चॉकलेट करंजी, चीज चकली, वेगवेगळ्या चवींचे नमकीन असे नवनवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत.
याशिवाय, बाजारपेठेत तयार फराळाचे आकर्षक पॅकिंग, अर्धा किलोपासून ते मोठ्या भेटवस्तूंच्या पेट्यांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत. नातेवाइकांना भेट देण्यासाठी तसेच कार्यालयीन सहकाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून फराळाचे बॉक्स खरेदी करण्याकडेही कल वाढत आहे. काही विक्रेत्यांकडून ग्राहकांच्या आवडीनुसार फराळाचे कॉम्बो तयार करून दिले जात आहेत.
घरच्या फराळाची चव, स्वच्छता आणि पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्यावर स्वतःचे नियंत्रण ही त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. तर तयार फराळामुळे वेळ, श्रम आणि धावपळ वाचते. त्यामुळे यंदा अनेक कुटुंबांनी घरगुती आणि तयार फराळाचा समतोल साधण्यास प्राधान्य दिले आहे. दिवाळीच्या परंपरेतील फराळाची जागा कायम असली, तरी तो तयार करण्याच्या पद्धतीत मात्र बदल होत आहे.
या विषयी बोलताना प्रिया शिरसाठ यांनी सांगितले की, विविध खाद्यपदार्थ तयार करण्याची मला आवड आहे. दिवाळीत मी नातेवाईक तसेच मित्रमंडळींकडून फराळाच्या ऑर्डर घेते. यासाठी काही महिला मदतनीसांची मदत घेऊन दिवाळी सुरू होण्याच्या आठवडाभर आधीच कामाला लागते. यातून पाचहून अधिक महिलांना रोजगार मिळतो. शिवाय, माझाही गृहउद्योग सुरू करण्याचा मार्ग सुकर होत आहे.
तयार फराळाचे दर
घरी बनवलेल्या पदार्थांच्या तुलनेत तयार फराळाचे दर अधिक आहेत. यावर पर्याय म्हणून काही महिला महाराजांकडून किंवा घरी मदतनीस बोलावून फराळ तयार करून घेत आहेत. सध्याच्या बाजारातील फराळाचे प्रतिकिलो दर पुढीलप्रमाणे आहेत.
- स्पेशल भाजणी चकली – ५४० रुपये
- करंजी – ५४० रुपये
- अनारसे – ५४० रुपये
- साजूक तुपातील अनारसे – १,००० रुपये
- साटोरी – ५४० रुपये
- चिरोट्या – ५४० रुपये
- गोड तसेच खारे शंकरपाळे – ३२० रुपये
- जिरापुरी – ३२० रुपये
- बाकरवडी – ३२० रुपये
- बुंदी लाडू – ४०० रुपये
- बेसन लाडू – ४०० रुपये
- साजूक तुपातील बेसन लाडू – ६०० रुपये
- रवा लाडू – ६०० रुपये
- पातळ पोह्यांचा चिवडा – ३६० रुपये
- भाजलेल्या पोह्यांचा चिवडा – ३२० रुपये’
