नाशिक – दिवाळी सणाला गुरुवारपासून वसुबारसने प्रारंभ होत आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला. दिवाळीसाठी कपडे, पूजा साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि फराळ साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये एकच गर्दी झाली. विशेषतः शहरातील मेनरोड परिसरात ग्राहकांची प्रचंड गर्दी होत आहे. गर्दीतही रिक्षाचालकांची मनमानी, वाहनांची वाढती वर्दळ यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

दिवाळीमुळे मेनरोड परिसरातील कपड्यांची दुकाने ग्राहकांनी गजबजली आहेत. कुटुंबासह खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कपड्यांच्या खरेदीबरोबरच दिवाळी पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यालाही मोठी मागणी आहे. लक्ष्मीपूजनाचे साहित्य, पणत्या, समया, रांगोळी, आकाशकंदील, तोरण, फुलांच्या माळा आणि सजावटीच्या वस्तूंनाही मागणी आहे. पारंपरिक वस्तूंबरोबर सजावटीच्या आधुनिक साहित्यालाही पसंती मिळत आहे. दरम्यान, वाढत्या गर्दीचा सर्वाधिक फटका वाहतुकीला बसत आहे. मेनरोड, शालिमार, रविवार कारंजा, दहीपूल या भागात खरेदीसाठी गर्दी होते. या ठिकाणी व्यावसायिकांची संख्या अधिक असून काहींनी रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत.

लोक रस्त्यावरच्या दुकानाजवळ थांबतात. वस्तु पाहतात. काही खरेदीसाठी भाव कमी करण्यासाठी वाद घालतात. याचा परिणाम वाहतूक खोळंब्यावर होत आहे. मेनरोडकडे जाणाऱ्या पर्यायी रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. काही रिक्षाचालकांकडून प्रवासी घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला तसेच गर्दीच्या ठिकाणी मनमानी पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी पादचारी, दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालकांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. सणासुदीच्या काळात बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी अधिक प्रभावी नियोजन करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेषत: रविवार कारंजा परिसरात रिक्षाचालकांची मनमानी कायमच होत असते. वाहतूक पोलीस याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नाशिककरांकडून केला जातो.

वाहनांना प्रवेश बंद

पोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्य बाजारपेठेत होणारी नागरिकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्या वतीने कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत मध्यवर्ती बाजारपेठेतील प्रमुख सात मार्ग वाहनविरहीत घोषित करण्यात आले असून सकाळी १० ते रात्री १० या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त चंद्रकांत गवळी यांनी दिली. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.