नाशिक – शहरातील गंगापूर रोड भागात आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी राहत्या घरी गळफास घेतला. डॉ. जेजुरकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरुन त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. निलेश जेजुरकर फरार असून स्थानिक गुन्हे शाखा तसेच गंगापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दुसरीकडे, नायगाव येथील सरपंचांसह ग्रामस्थांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली.डॉ. मनीषा जेजुरकर या गंगापूर रोड भागात कुटूंबासह वास्तव्यास होत्या. शुक्रवारी त्यांनी गळफास घेतला. जिल्हा शासकीय रुग्णालयात कार्यरत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्या त्या पत्नी होत्या. डॉ. मनीषा यांच्या पश्चात पती, दोन मुली असा परिवार आहे.
रविवारी मनीषा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरुन गंगापूर पोलीस ठाण्यात डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. मनीषा यांची बहीण प्रा. रोहिणी थोरात यांनी दोन वर्षापासून निलेश जेजुरकर हे मनीषाचा मानसिक छळ करीत होते, अशी तक्रार केली. निलेश यांचे एका महिला डाॅक्टरशी अनैतिक संबंध होते.
या संबंधामध्ये मनीषा अडथळा ठरत असल्याने तिचा मानसिक छळ करण्यात येत होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, या घटनेनंतर फरार असलेले डॉ. निलेश जेजुरकर हे अद्यापही पोलिसांना सापडू शकलेले नाहीत. डॉ. मनीषा यांच्या मृत्यू प्रकरणी नायगाव येथील ग्रामस्थ तसेच सरपंच यांनी मंगळवारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली.
डॉ. मनीषा यांच्या मृत्यू प्रकरणाचा सखोल, निष्पक्ष व पारदर्शक तपास करण्यात यावा, सासरच्या छळासंदर्भात तसेच डॉ. निलेश जेजुरकर यांच्या कथित विवाहबाह्य संबंधाबाबत करण्यात आलेल्या आरोपांची दखल घेऊन सखोल चौकशी करावी, या प्रकरणातील सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात यावे, तपास प्रक्रियेची माहिती वेळोवेळी कुटूंबियांना देण्यात यावी, पीडित कुटूंबियांना न्याय देण्यात यावा, आदी मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या.
डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुध्द गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते फरार आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर अहवाल पाठवला आहे. त्यानुसार संबंधितावर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. सतीश शिंपी (जिल्हा शल्य चिकित्सक)
