नाशिक : जिल्ह्यात प्राणी चावण्याच्या विविध घटनांमध्ये वाढ होत असताना सर्पदंश आणि रेबीजमुळे होणारे मृत्यू चिंताजनक आहेत. मागील तीन वर्षांत सर्पदंशामुळे ४०हून अधिक, तर रेबीजमुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. कुत्रा चावण्याच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत असून, नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील विविध शासकीय आरोग्य संस्थांमध्ये नोंदविण्यात आलेल्या प्राणी चावण्याच्या घटनांचा आढावा घेतला असता, नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयासह मालेगाव ग्रामीण रुग्णालय, मनमाड, सटाणा, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, लासलगाव, कळवण, चांदवड आणि गिरणारे येथील आरोग्य संस्थांमध्ये सर्पदंश, कुत्रा चावणे तसेच रेबीजची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.

कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये मागील तीन वर्षांत मोठी वाढ झाली आहे. २०२३-२४ मध्ये २६ हजार २५१ घटना नोंदविण्यात आल्या होत्या. २०२४-२५ मध्ये हा आकडा २९ हजार २८१ वर पोहोचला, तर २०२५-२६ मध्ये तब्बल ४३ हजार ३९ इतक्या घटना नोंदविण्यात आल्या. म्हणजेच २०२३-२४च्या तुलनेत २०२५-२६ मध्ये कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये सुमारे ६४ टक्के वाढ झाली आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षात जूनअखेर १० हजार ४५५ घटनांची नोंद झाली आहे. या कालावधीत कुत्रा चावल्यामुळे मृत्यूची नोंद झालेली नाही.

सर्पदंशाच्या घटनांमध्ये मात्र काहीशी घट दिसून येत आहे. २०२३-२४ मध्ये ५ हजार ३०५, २०२४-२५ मध्ये ५ हजार २९१ आणि २०२५-२६ मध्ये ४ हजार ९७७ सर्पदंशाच्या घटनांची नोंद झाली. २०२६-२७ मध्ये जूनअखेर १ हजार १४६ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. मागील तीन वर्षांत सर्पदंशामुळे ४०हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

रेबीजची प्रकरणेही चिंताजनक आहेत. २०२३-२४ मध्ये तीन, २०२४-२५ मध्ये चार, तर २०२५-२६ मध्ये १४ रेबीजच्या रुग्णांची नोंद झाली. मागील तीन वर्षांत रेबीजमुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

जखम तातडीने धुणे आवश्यक

प्राणी चावल्यानंतर नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. मात्र, योग्य वेळी उपचार घेतल्यास मनुष्यहानी टाळता येऊ शकते. प्राणी चावल्यानंतर जखम वाहत्या पाण्याने आणि साबणाने साधारण १५ मिनिटे धुवावी. जखमेवर मिरची, चुना, तेल, माती किंवा कोणतेही घरगुती पदार्थ लावू नयेत. जखम लहान असली तरी विलंब न करता जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक लसीकरण करून घ्यावे.

सर्पदंश झाल्यास…

सर्पदंश झाल्यास रुग्णाला शांत ठेवून शक्य तितक्या लवकर वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे. सर्पदंशाच्या ठिकाणी अनावश्यक कापणे, जखम चोखणे किंवा घट्ट दोरी बांधणे टाळावे, अशा सूचना आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.