नाशिक – जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने १३ धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरी, दारणासह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रविवारी त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्याजवळ अडकलेल्या १२ ते १५ पर्यटकांना वन विभागाने आपदा मित्र, स्थानिकांच्या मदतीने चार तासानंतर सुरक्षित बाहेर काढले. त्र्यंबकेश्वर तालुक्यात तलावात बुडून युवकाचा मृत्यू झाला. सुरगाणा तालुक्यात मंदिरावर दरड कोसळली.
नाशिक, आंबोली, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ४० हजार क्युसेकचा विसर्ग होत आहे. जुुलैच्या पूर्वार्धात लहान-मोठ्या २४ धरणांचा जलसाठा ३४ हजार ३४१ दशलक्ष घनफूट म्हणजे ५७ टक्क्यांवर गेला. त्यामुळे धरणांमधून सातत्याने पाणी सोडावे लागत आहे. रविवारी एकूण १३ धरणांतील विसर्गात वाढ करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. गोदावरीच्या पुराचे निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत या पावसाळ्यात तिसऱ्यांदा पाणी आले असून गोदावरी दुथडी भरून वहात आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी येथे धबधबा बघण्यासाठी डोंगर, दरी उतरून पर्यटक जातात. पाण्याच्या प्रवाहातून धबधब्यापर्यंत जावे लागते. रविवारी दुगारवाडी धबधबा परिसरात गेलेले १२ ते १५ पर्यटक प्रवाह अकस्मात वाढल्याने अडकून पडले. याची माहिती मिळताच वन विभागाने आपदा मित्र, स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने संबंधितांना अन्य मार्गाने सुरक्षितपणे बाहेर काढल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. तळवाडे येथे तलावात बुडालेल्या मनिष पवार (३२, सातपूर) युवकाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. पावसाने काही भागात घरांची पडझड झाली.
चार तास बचाव मोहीम
दुगारवाडी धबधबा परिसरात रविवारच्या सुट्टीमुळे सुमारे दीड हजार पर्यटक आले होते. या ठिकाणी सुरक्षिततेसाठी १० सुरक्षारक्षकांची नेमणूक केलेली आहे. अनेकदा पर्यटक त्यांना जुमानत नाहीत. पाऊस वाढल्याने, काही पर्यटकांना माघारी पाठविण्यात आले. धबधबा परिसरात पाण्याचा प्रवाह कमी असताना महाविद्यालयीन मुले-मुलींचा गट गेला होता. नंतर प्रवाह वाढल्याने ते दुसऱ्या बाजूला अडकून पडले. तीन ते चार तासानंतर ११ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती वन क्षेत्रपाल शेखर देवकर व वन परिक्षेत्र अधिकारी मधुकर चव्हाण यांनी दिली. अडकलेल्या पर्यटकांना वनरक्षक कैलास महाले, शालिनी पवार, सरपंच संजय बांगारे व ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.