नाशिक – शहरात प्रवासी वाहतुकीला हळूहळू ई रिक्षांची जोड मिळत आहे. नव्याने उत्पादित झालेल्या ई-रिक्षांची नोंदणी आणि रस्त्यांवरील त्यांचा वापर याविषयी नाशिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरणच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ई रिक्षा या इंधन आणि गॅसवरील रिक्षांच्या तुलनेत संथ धावतात. ताशी २५ किलोमिटर इतकाच त्यांचा वेग आहे. त्यामुळे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर ई रिक्षांना वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. राष्ट्रीय मार्ग व राज्य महामार्ग वगळता त्यांनी शहरातील इतर मार्गांवर प्रवासी वाहतूक करावी, असा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची बैठक झाली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, प्राधिकरण सदस्य सचिव विजय शेळके, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड उपस्थित होते. जिल्ह्यात वाहनांची संख्या वाढत आहे. मागील काही महिन्यात अपघातांचीही संख्या वाढली असून वाहतुकीशी संबंधित विविध समस्या लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. सार्वजनिक वाहतुकीचे व्यवस्थापन, वाहतुकीशी संबंधित विषय आणि सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा सहभाग वाढविण्याचे धोरण आदींवर चर्चा करण्यात आली. निवडणूक, नैसर्गिक आपत्ती व इतर शासकीय कामांसाठी आवश्यक रुग्णवाहिका, रिक्षा व अनुषंगिक वाहनांचे भाडेदर निश्चित करण्यात आले.
प्रवासी वाहतुकीसाठी शहरात ई रिक्षा दाखल होत आहेत. ई रिक्षांची नोंदणी प्रादेशिक परिवहन विभागामार्फत केली जाणार आहे. या रिक्षांनी कोणत्या भागात सेवा द्यावी, ते मार्ग बैठकीत निश्चित करण्यात आले. ई रिक्षाचा ताशी २५ किलोमीटर इतका वेग आहे. इंधन व गॅसवर चालणाऱ्या ॲटोरिक्षांच्या तुलनेत हा वेग बराच कमी आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग वा राज्य मार्गावर वाहतूक कोंडी वा अपघात होऊ नये, यासाठी ई रिक्षांना राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावर वाहतुकीला प्रतिबंध असणार आहे. ई रिक्षांसाठी राष्ट्रीय व राज्य महामार्ग वगळता शहरातील इतर मार्ग सेवा देण्यासाठी निश्चित करण्यात आल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी सांगितले. ई रिक्षांना अन्य रिक्षांसाठी लागू असणारे प्रवासी भाडे दर लागू आहेत.
अँटोरिक्षा मिटरसाठी पाच सप्टेंबर अंतिम मुदत
ऑटो रिक्षांना देण्यात येणाऱ्या इरादापत्रांचा कालावधी संपुष्टात आल्यास अशा इरादापत्रांना केवळ एकदाच सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच रिक्षांचे ‘मीटर कॅलिब्रेशन’ ६० दिवसांच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यासाठी पाच सप्टेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
