नाशिक : जिल्ह्यातील काही  तालुक्यांत मागील काही दिवसांपासून सातत्याने भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या भागातील धरणे, तलाव, मोठे पूल, शासकीय इमारती आदींची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. भूकंपाच्या धक्क्यांमुळे धरणांच्या भिंती, सांडवे किंवा पुलांना तडे गेले आहेत का, पाण्याची गळती वाढली आहे का अथवा अन्य कोणतीही संरचनात्मक हानी झाली आहे का, याची तांत्रिक पडताळणी करण्यात येणार आहे.

सुरगाणा, दिंडोरी, पेठ व कळवण तालुक्यांतील काही भागांत मागील चार दिवसांत २ ते ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (मेरी) भूकंपमापन केंद्रात त्याची नोंद झाली आहे. मागील काही वर्षांपासून कळवण तालुक्यातील दळवट परिसर भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यांतील काही भागांत पावसाळ्यात भूगर्भात काही हालचाली जाणवत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. घाटमाथ्यावरील या भागात मुसळधार पाऊस झाला होता. नद्या-नाल्यांना पूर येऊन हे तालुके जलमय झाले होते. त्यानंतर भूकंपाच्या सौम्य धक्क्यांची जणू मालिका सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

भूकंपाच्या धक्क्यांमुळे जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने महत्त्वाच्या पायाभूत सुविधांची सुरक्षितता तपासण्याची गरज व्यक्त केली आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील धरणे, कालवे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील महत्त्वाचे पूल, रस्ते व शासकीय इमारती तसेच इतर विभागांच्या अखत्यारीतील संबंधित मालमत्तांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सूचित करण्यात आले आहे.

तांत्रिक तपासणी होणार

भूकंपाचे धक्के जाणवलेल्या सुरगाणा, दिंडोरी, पेठ, कळवण व त्र्यंबकेश्वर या पाच तालुक्यांतील सर्व धरणे, तलाव, मोठे पूल, शासकीय विश्रामगृहे, वसतिगृहे, समाजमंदिरे, शासकीय इमारती आणि शाळांची तातडीने पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणत्याही धरणाच्या भिंतीला, सांडव्याला किंवा पुलाला तडे गेले आहेत का, पाण्याची गळती वाढली आहे का, खचणे किंवा इतर कोणतीही संरचनात्मक हानी झाली आहे का, याची तांत्रिक तपासणी करण्याचे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत. तपासणीअंती संभाव्य धोका आढळल्यास तातडीने आवश्यक ती प्रतिबंधात्मक व दुरुस्तीची कार्यवाही हाती घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.