नाशिक : शनिवारी रात्री नाशिक शहरासह जिल्ह्यातील आठ तालुक्यांना भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल नोंदविण्यात आली असून नाशिकपासून साधारण ४८ किलोमीटर अंतरावर त्याचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले. भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

जुलैअखेरपासून सुरगाणा, दिंडोरी, पेठ आणि कळवण तालुक्यांतील काही भागांत २ ते ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के सातत्याने जाणवत होते. शनिवारी रात्री जाणवलेल्या धक्क्याची तीव्रता तुलनेने अधिक होती. विविध संस्थांच्या भूकंपमापन केंद्रांवर त्याची नोंद झाली. त्यामध्ये ३.८, ४.३ आणि ४.१ रिश्टर स्केल अशी वेगवेगळी आकडेवारी समोर आली. महाराष्ट्र संशोधन संस्थेच्या केंद्रावर भूकंपाची तीव्रता ४.१ रिश्टर स्केल नोंदविण्यात आली. संस्थानिहाय सेन्सर, मापनपद्धती आणि अन्य तांत्रिक बाबींमुळे नोंदींमध्ये फरक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

नाशिक शहरातही जाणवला हादरा

ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत भूकंपाचे धक्के जाणवत असले, तरी त्याचे हादरे नाशिक शहरात जाणवले नव्हते. शनिवारचा धक्का मात्र नाशिककरांना प्रकर्षाने जाणवला. अनेकांनी एकमेकांना दूरध्वनी करून याबाबत खातरजमा केली. पेठ, दिंडोरी आणि कळवण तालुक्यांत धक्क्याची तीव्रता अधिक जाणवली, तर नाशिक, चांदवड आणि देवळा भागांत सौम्य धक्के जाणवले. सुरगाणा आणि निफाड तालुक्यांतील काही भागांतही धक्के जाणवल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे सतर्कतेचे आवाहन

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी आपल्या इमारतीला तडे गेले आहेत का किंवा अन्य कोणता धोका निर्माण झाला आहे का, याची पाहणी करावी. धोका आढळल्यास इमारतीत न राहता स्थानिक प्रशासन, नगरपालिका, ग्रामपंचायत किंवा महापालिकेशी तातडीने संपर्क साधावा भूस्खलनप्रवण क्षेत्र आणि घाट परिसरात जमिनीला भेगा पडल्या आहेत का, जमिनीखालून पाणी वाहण्याचा आवाज येतो आहे का, याकडेही लक्ष ठेवावे. अशी परिस्थिती आढळल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे. प्रशासन पूर्णपणे सतर्क असून सर्वत्र निरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत कोणत्याही नुकसानीची माहिती मिळालेली नाही. नागरिकांनी घाबरू नये; मात्र सतर्क राहावे, असे प्रसाद यांनी म्हटले आहे.

सुरगाणा, दिंडोरीत घरांना तडे

भूकंपाच्या धक्क्यामुळे सुरगाणा तालुक्यातील भदर येथे एका घराला तडे गेल्याची माहिती तहसीलदारांनी दिली. तसेच दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथील घराच्या भिंतीलाही तडे गेल्याचे समोर आले आहे. प्रशासनाकडून दोन्ही ठिकाणी पाहणी करण्यात येत आहे.