नाशिक – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल, ठाणापाडा आणि पेठ तालुक्यातील काही भागात २२ ते २४ फेब्रुवारी असे सलग तीन दिवस भूकंपाचे सौम्य हादरे जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर १.२ ते १.५ इतकी नोंदविली गेली. नाशिकपासून २४ ते ३८ किलोमीटर अंतरावर या हालचाली घडल्याचे महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) म्हटले आहे.
जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील दळवट परिसर भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या भागासह सुरगाणा, पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही भागात भूगर्भात अधूनमधून हालचाली जाणवत असतात. त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यात सलग तीन दिवस भूगर्भीय हालचाली आणि जमिनीतून कंपने जाणवत आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल, ठाणापाडा व पेठ तालुक्यातील मौजे पाटे व आसपासच्या भागात सौम्य स्वरूपात हादरे जाणवल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील भूकंपमापन केंद्राच्या माहितीनुसार, या धक्क्यांची तीव्रता १.२ ते १.५ रिश्टर स्केल इतकी नगण्य नोंदविली गेली. या हालचालींचे केंद्र नाशिकपासून २४ ते ३८ किलोमीटर अंतरावर होते. नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नये आणि समाजमाध्यमांवरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासन व संबंधित वैज्ञानिक विभाग भूगर्भीय हालचालींवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे व शांततेत पार पाडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये सुरगाणा तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य हादरे बसले होते. सुरगाणा, कळवण तालुक्यातील दळवट तसेच पेठ या आदिवासी भागात मागील काही वर्षांत अधूनमधून भूगर्भात घडामोडी जाणवत आहेत. त्यामुळे काही पुनद धरणावर वेधशाळा उभारण्यात आली होती, परंतु तिथे भूकंपमापन यंत्रणा बसविली गेली नाही.
नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, तरी त्याचा केंद्रबिंदू मिळणे अवघड बनते; कारण भूकंपाचा केंद्रबिंदू शोधण्यासाठी धक्क्यांची तीन केंद्रांवर नोंद होणे गरजेचे असते. जलसंपदा विभागाच्या ३० भूकंप वेधशाळांपैकी २८ वेधशाळा बंद आहेत. केंद्र सरकारची राष्ट्रीय भूकंप विज्ञान संस्था राज्यातील सहा यंत्रांत स्थानिक भूकंपाची नोंद घेते. त्यांच्यामार्फत तीन रिश्टर स्केलपेक्षा कमी क्षमतेच्या स्थानिक भूकंप धक्क्यांची नोंद घेतली जात नसल्याचे जाणकार सांगतात.

