नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मागील आठवड्यापासून सातत्याने भूकंपाचे सौम्य हादरे बसत असून काही वेळा दिंडोरीजवळील पेठ, कळवण, सुरगाणा या तालुक्यांनाही हादरे बसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांना विश्वास देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत असतानाच गुरुवारी पहाटे पुन्हा सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे दोन वेळा हादरे जाणवले. एकूणच, नाशिक जिल्ह्यास मागील सहा दिवसांत १० हादरे बसले आहेत.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (NCS) पृथ्वी विज्ञान मंत्रालय यांच्या प्राथमिक अहवालानुसार, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याच्या परिसरात २५ जुलैपासून भूकंपाच्या सौम्य हालचाली नोंदविण्यात आल्या आहेत. सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. २९ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत एकूण ९ भूकंप नोंदविण्यात आले. त्यांची तीव्रता M 2.8 ते M 3.9 दरम्यान आहे. यापैकी ७ धक्के M 3.0 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे होते. सर्वाधिक तीव्रतेचा धक्का M 3.9 चा असून तो २८ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.२७ वाजता नोंदवला गेला.
ही घटना “भूकंप समूह” (earthquake swarm) या प्रकारातील आहे. म्हणजे कमी कालावधीत अनेक सौम्य धक्के, कोणताही एक प्रमुख मोठा धक्का न येता. या धक्क्यांची खोली उथळ (साधारण १० किमी किंवा त्याहून कमी) असल्याने ते जमिनीखालून येणाऱ्या गडगडाटासारख्या आवाजासह जाणवू शकतात; त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण होऊ शकते. नाशिक जिल्हा हा भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) भूकंप विभागणी नकाशानुसार भूकंप क्षेत्र-३ (Seismic Zone III) मध्ये येतो. या भागात १९०० ते २०२६ या कालावधीत M 5.0 पेक्षा जास्त तीव्रतेचा मोठा भूकंप नोंदवला गेलेला नाही; आजवरचा सर्वात मोठा भूकंप २६ फेब्रुवारी १९८६ रोजीचा M 4.3 चा होता.
यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नसल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असताना गुरुवारी पहाटे पुन्हा सुरगाणा तालुक्यात दोन भूकंपाचे हादरे बसले. या भूकंपाचे केंद्र सुरगाणा तालुक्यातील बोरगाव, भोरमाळ आणि काठुळा परिसरात होते. दिंडोरी तालुक्यातील काही भागातही भूकंपाचे हलके धक्के जाणवल्याची माहिती देण्यात येत आहे. सद्यस्थितीत जगात कोठेही भूकंपाचे नेमके ठिकाण, वेळ व तीव्रता याचा अचूक अंदाज वर्तविण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. एनसीएसच्या नाशिक वेधशाळेसह महाराष्ट्रातील सर्व वेधशाळा या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. संभाव्य हानी टाळण्यासाठी इमारती बीआयएस निकषांनुसार बांधलेल्या असणे आवश्यक आहे. प्रशासनाकडून कितीही आश्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी ग्रामीण भागातील नागरिक मात्र वारंवार होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले आहेत. हे धक्के थांबणार तरी कधी, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
