नाशिक – काही दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यातत भुकंपाचे धक्के बसत आहेत. इतक्या दिवसांपासून धक्के बसण्याच्या कारणांविषयी संशोधकांचा अभ्यास सुरू आहे. जिल्ह्याचा वेगाने होणारा विकास, पाण्यासाठी होणारे खोदकाम, जिल्ह्यातील धरणे, पावसाचे वाढलेले प्रमाण आणि त्यामुळे वाढलेला जलप्रवाह, अशी वेगवेगळी कारणे भूकंपाच्या सततच्या धक्क्यांमागे असल्याचे सांगितले जाते.

नाशिकजवळील पालघर जिल्ह्यात जाणवणारे भूकंपाचे धक्के आता नाशिक, दिंडोरी, कळवण, पेठ परिसरातही जाणवू लागले आहेत. यामुळे काही ठिकाणी भिंतीला तडे जाणे, जमिनीला भेगा पडल्या आहेत. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी वेगवेगळ्या तीव्रतेच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीती आहे. भूकंपांच्या कारणांचा संशोधकांकडून अभ्यास केला जात आहे. याविषयी नाशिकच्या एमईटी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअरींगमधील सहायक प्राध्यापक आणि भूगर्भशास्त्र तज्ज्ञ ईश्वर भाटे यांनी आपली निरीक्षणे मांडली आहेत.

शहर तसेच जिल्ह्याचा वेगाने होणारा विकास हे एक कारण प्रा. भाटे यांना वाटते. गगनचुंबी इमारती तयार होत असतांना त्याचा पाया खोलवर जात आहे. एवढ्या लोकांची तहान भागविण्यासाठी कूपनलिका केल्या जात आहेत. ग्रामीण भागातील विहिरी, विंधनविहिरी खोदल्या जात आहेत. यामुळे भूगर्भाला हादरे बसत आहेत. पाणी मोठ्या प्रमाणावर शोषले जात असून यामुळेही ताण येत असल्याने भूकंप होऊ शकतो. नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाल्याने हे पाणी जमिनीत झिरपत आहे. पाणी जमिनीत मुरत असतांना तडे दुभंगत आहेत. भूगर्भातील पाण्याचा दबाव वाढल्यानेही पाण्यात कंप होऊन हादरे बसतात. जिल्ह्यात गंगापूर, कश्यपी, गौतमी, दारणा यासह अनेक धरणे आहेत. उन्हाळ्यात धरणांच्या पाण्याची पातळी खाली जाते. पावसाळ्यात पातळी वाढत जाते. या वाढलेल्या पातळीचा दबाव पडल्यानेही भूकंप होऊ शकतो. या प्रक्रियेला मायक्रोसिस्मसिटी म्हणजे अंतर्गत भागात होणारी सूक्ष्म भूकंपाची क्रिया किंवा लघु भूकंपावली म्हणतात, असे प्रा. भाटे यांनी नमूद केले.

सुरगाणा, पेठ तालुक्यांमध्ये पाण्यासाठी अधिक खोदकाम झाले. पावसाळ्यात तिकडे मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. पावसाचे पाणी खोलवर गेले. अतिरिक्त पाण्याचा दाब आल्याने त्याठिकाणी भूकंप झाला. त्या लहरी शहरानजीक पोहचल्या. आणि नाशिकलाही धक्के जाणवले. पालघर परिसरात भूकंपाविषयी इस्त्रोकडून अभ्यास केला जात आहे. पावसाळा सुरु असेपर्यंत असे धक्के जाणवू शकतात, असा अंदाज प्रा. भाटे यांनी व्यक्त केला आहे.

सध्याचे कंपन मर्यादित कालावधीसाठी

१९९३ पर्यंत सुरक्षित समजला जाणारा महाराष्ट्र हा भूकंपप्रवण क्षेत्र दाेनमधून तीनमध्ये स्थलांतरीत झाला आहे. परिणामी भूकंपाचे धक्के अधिक जाणवणे असे असले तरी सध्याचे जे कंपन जाणवते ते पाणी आणि पावसाळ्यापुरता मर्यादित आहे हे मात्र नक्की असे मत भूगर्भशास्त्र तज्ज्ञ प्रा. ईश्वर भाटे यांनी व्यक्त केले.