नाशिक : भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाच्या ३१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकताच नाशिकचा तीन दिवसांचा अभ्यास दौरा पूर्ण केला. मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा पार पडला.
या दौऱ्याचे आयोजन आणि यजमानपद सह्याद्री फार्म्स पोस्ट हार्वेस्ट केअर लिमिटेडने भूषवले. या शिष्टमंडळात अनेक उच्चपदस्थ आर्थिक सल्लागार, संचालक, उपसंचालक आणि युवा तज्ज्ञांचा समावेश होता. नाशिकमधील शेती, प्रगत उद्योग, औषधनिर्मिती क्षेत्र आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थेची सखोल माहिती घेणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी अधिकाऱ्यांनी सह्याद्री फार्म्सच्या शेतकरीकेंद्रित कार्यपद्धतीचा सविस्तर अभ्यास केला. त्यांनी द्राक्ष, केळी आणि डाळिंब यांसारख्या फळांची निर्यात साखळी, पॅकहाऊस आणि आधुनिक प्रक्रिया केंद्रांची पाहणी केली. तसेच शेतीतील नवीन तंत्रज्ञान, हवामानसहिष्णू वाण, ड्रोनचा वापर, कृषी सौरऊर्जा आणि रोबोटिक्स यांसारख्या उपक्रमांची माहिती घेतली. सावरगाव येथील शेतकरी गटाशी संवाद साधून ग्रामीण अर्थकारण समजून घेतले. यानंतर सगीर गावातील कुक्कुटपालन व्यवसायाची पाहणी केली.
औषधनिर्मितीपासून वाइननिर्मितीपर्यंत…
शिष्टमंडळाने अक्राळे-दिंडोरी येथील रिलायन्स लाइफ सायन्सेसला भेट देऊन जैवऔषधनिर्मिती आणि प्लाझ्मा उत्पादनांविषयी माहिती घेतली. यानंतर सातपूर औद्योगिक वसाहतीमधील टीडीके इलेक्ट्रॉनिक्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांना भेट देऊन स्वयंचलित उत्पादन प्रक्रिया, वाहनांचे सुटे भाग निर्मिती आणि भविष्यातील तंत्रज्ञानाविषयी सविस्तर चर्चा केली. दिवसाच्या शेवटी अधिकाऱ्यांनी सुला व्हाइनयार्ड्सला भेट देऊन वाइननिर्मिती, पर्यटन आणि द्राक्षशेतीच्या मूल्यसाखळीची माहिती घेतली.
पैठणी विणकरांशी संवाद
दौऱ्याच्या अंतिम दिवशी अधिकाऱ्यांनी येवला येथील प्रसिद्ध कापसे पैठणी केंद्राला भेट दिली. तेथे त्यांनी पारंपरिक पैठणी साड्यांची निर्मिती, ग्रामीण भागातील महिलांचा सहभाग, कौशल्यविकास आणि निर्यातीबाबत विणकरांशी चर्चा केली. त्यानंतर नाशिक शहरातील कुंभमेळा आयुक्त कार्यालयात जाऊन आगामी कुंभमेळ्याच्या नियोजनाची माहिती घेतली. शेवटी एबीबी कंपनीच्या केंद्राला भेट देऊन वीज उपकरणांची निर्मिती आणि वीज वितरण यंत्रणेच्या आधुनिकीकरणावर चर्चा करण्यात आली.
नाशिकच्या आर्थिक क्षमतेची दखल
या अभ्यास दौऱ्यामुळे राष्ट्रीय पातळीवर आर्थिक धोरणे आखणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणकर्त्यांना मोलाची माहिती मिळाली आहे. शेती, उद्योग, अभियांत्रिकी आणि पारंपरिक कला यांचा मेळ घालणाऱ्या नाशिकच्या प्रादेशिक अर्थव्यवस्थेचे या दौऱ्यातून उत्तम दर्शन घडले. सह्याद्री फार्म्सने केलेल्या नियोजनामुळे आणि स्थानिक सांस्कृतिक सादरीकरणामुळे शिष्टमंडळाला नाशिकच्या समृद्ध संस्कृतीचीही ओळख झाली. या दौऱ्यामुळे नाशिक जिल्ह्याला देशाच्या आर्थिक नकाशावर विशेष स्थान मिळाले असून, भविष्यात केंद्र सरकारकडून धोरणात्मक पाठबळ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
