उत्साहाच्या भरात उमेदवारांची गुन्हेगारी कुंडली पाहण्याचा विसर

ग्रामीण भागात फलक वाचनात काही तरुण वगळता इतरांनी रुची दाखविली नाही.

मतदान केंद्राबाहेर उमेदवारांची शैक्षणिक, आर्थिक व गुन्ह्यांविषयीची माहिती देणारा फलक पाहताना मतदार.

*    शहरी भागांत माहितीचे फलक उपक्रमाचे स्वागत *   पोलिसांच्या लेखी गुन्हेगार, तर फलकावर मात्र निष्पाप

उमेदवारांची आर्थिक स्थिती आणि गुन्हेगारी पाश्र्वभूमी उघड करण्यासाठी निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच केंद्रांबाहेर त्यासंबंधीच्या माहितीचे फलक उभारले खरे, तथापि, काही अपवाद वगळता मतदारांकडून मतदानाच्या उत्साहाच्या भरात त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळाले. शहरी भागात सुशिक्षितांनी या फलकांवरील माहितीचे बारकाईने वाचन केले. परंतु, कित्येकांना असा फलक आहे, हेच मतदान करून बाहेर पडेपर्यंत ज्ञात नव्हते. ग्रामीण भागात फलक वाचनात काही तरुण वगळता इतरांनी रुची दाखविली नाही. शहरी भागत मात्र मतदारांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांची सखोल माहिती मतदारांसमोर यावी आणि त्यातून त्यांनी योग्य उमेदवाराची निवड करावी, या उद्देशाने निवडणूक आयोगाने यंदा मतदान केंद्रांबाहेर त्या त्या प्रभाग, गट व गणातील उमेदवारांच्या माहितीचे फलक उभारले होते. त्यात प्रत्येक उमेदवाराची शैक्षणिक अर्हता, त्याची आर्थिक स्थिती, त्याच्याविरुध्द दाखल गुन्हे व झालेली शिक्षा आदींची माहिती दिली गेली.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या २६४६ मतदार केंद्रांवर तब्बल पाच हजार २०० फलक तर महापालिकेच्या १४०७ मतदान केंद्रांवर याच पध्दतीने अडीच हजारहून अधिक फलक लावण्यात आले. काही ठिकाणी फलकांची जागा निवडताना गफलत झाली.

मतदार ज्या मार्गाने केंद्रात जाणार आहे, त्या केंद्राच्या दरवाजाच्या विरुध्द बाजुला फलक लावले गेले. यामुळे अनेकांना ते दृष्टिपथास पडले नाहीत. काही ठिकाणी समोर फलक असूनही अनेकांनी ते वाचण्याची तसदी घेतली नाही. मात्र, काही सुशिक्षित मतदारांनी जाणीवपूर्वक फलकांचे वाचन केले. प्रचारादरम्यान आश्वासनांचा वर्षांव करणारे उमेदवार आपली गुन्हेगारी पाश्र्वभूमी कधी उघड करत नाहीत. किमान या फलकांनी उमेदवारांची गुन्हेगारी व आर्थिक कुंडली मतदारांसमोर आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

२० वर्षे गुन्हेगार ‘निरंक’

ज्यांना २० वर्ष गुन्हेगार म्हणून ओळखतो, त्यांच्या नावावर एकही गुन्हा (निरंक) दाखल नसल्याची माहिती संबंधित फलकावरून एका मतदाराला  समजली. हे पाहून त्याला धक्काच बसला.   त्या उमेदवारांवर न्यायालयात एकही खटला नाही.  असे म्हटले होते. नाशिकरोडच्या प्रभाग क्रमांक २० मधील मतदाराने ही बाब कथन केली. सिडकोतही पोलिसांनी आधी जाहीर केलेली उमेदवारांवरील गुन्ह्यांची यादी आणि प्रत्यक्ष फलकांवरील माहिती यात तफावत होती. हे मतदारांनी दाखवून दिल्यानंतर ही बाब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मान्य केली.

मतदारांना ‘डोळस’ मतदानाची सुविधा

यंदा प्रथमच केंद्राबाहेर सर्व उमेदवारांची मालमत्ता, शैक्षणिक पात्रता तसेच दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपशील लावलेला दिसला. हा सर्व तपशील काळजीपूर्वक वाचला. प्रथमपासून ‘सद्वर्तनी’ अशी ख्याती असणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांविरुध्द दाखल गुन्ह्यांची संख्या पाहून आश्चर्य वाटले. कोणीही उमेदवार आपल्या गुन्हेगारीबद्दल प्रचारात माहिती देत नाही. त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेले प्रतिज्ञापत्र कागदोपत्री फाईलमध्ये बंद असते. या उपक्रमामुळे उमेदवाराच्या आर्थिक तसेच शैक्षणिक समृध्दीबाबत माहिती मिळाल्याने ‘डोळस’ मतदान होण्याची शक्यता वाढली आहे. आता राजकीय पक्षही उमेदवार निवडताना या सर्व बाबींचा विचार करतील, अशी अपेक्षा.

– अभिषेक जोशी (इआरपी व्यवस्थापक,  माहिती तंत्रज्ञान कंपनी)

 

मतदारांना विचारप्रवृत्त केले

पोलीस यंत्रणेचा हा उपक्रम चांगला आहे. कोणत्याही नोकरीसाठी उमेदवार कमीतकमी पदवीधर असावा लागतो. मग कोटय़वधींची उलाढाल असलेली महापालिका अशिक्षित व गुंड प्रवृत्तींच्या हाती का द्यावी ? त्यामुळे ‘गुन्हेगारी कुंडली’ने मतदारांना विचार करायला लावले.

– संदीप शेटे (व्यावसायिक)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Nashik elections 2017 nashik candidates affidavit nashik voters

ताज्या बातम्या