नाशिक – आंतरराष्ट्रीय ब्रीज या क्रीडा प्रकाराला दिवसेंदिवस महत्व येत असल्याने या खेळाच्या स्पर्धांकडे आता खेळाडू मोठ्या प्रमाणावर ओढले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्रातील नाशिक हे ब्रीज खेळाचे एक प्रमुख केंद्र होऊ लागले आहे. नाशिक येथे वर्षभरात अनेक स्पर्धांचे आयोजन होत असल्याने नवोदित खेळाडूंनाही त्याचा फायदा होत आहे. शनिवारपासून नाशिक येथे कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेतील कामगिरीतूनच भारतीय प्राथमिक संघाची निवड करण्यात येणार असल्याने या स्पर्धेल महत्व प्राप्त झाले आहे.

महाराष्ट्र ब्रीज संघटना आणि नाशिक जिल्हा ब्रीज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे कनिष्ठ गटाच्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धा आणि निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला शनिवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. तीन दिवस सुरु राहणाऱ्या या स्पर्धेचे उदघाटन केद्रीय वस्तू आणि सेवा कर तथा उत्पाद आणि सीमा शुल्क विभागाचे सहआयुक्त जगदीश डोडी (डी. जगदीश) यांच्या हस्ते झाले. यावेळी नाशिकचे क्रीडा संघटक तथा व्यावसायिक चंद्रशेखर सिंग, ब्रीज फेडेरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष तथा या कनिष्ठ गटाच्या उपक्रमाचे प्रमुख आनंद सामंत, ब्रीजचे विश्व स्पर्धा पदक विजेते तथा प्रशिक्षक अनिल पाध्ये, या स्पर्धेचे आयोजन प्रमुख तथा महाराष्ट्र ब्रीज संघटनेचे सचिव हेमंत पांडे, नाशिक जिल्हा ब्रीज संघटनेचे सचिव डॉ. अतुल दशपुत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी केद्रीय वस्तू आणि सेवा कर तथा उत्पाद आणि सीमा शुल्क विभागाचे सहआयुक्त जगदीश डोडी यांनी, ब्रीज हा आपल्या मेंदूला चालना देणारा खेळ असल्याचे सांगितले. बिल गेट्स सारख्या मोठ्या उद्योजकापासून ते अनेक उच्च शिक्षण घेणारे या खेळाशी जोडलेले आहेत. या खेळाचा खेळाडूंना खेळाबरोबरच आपल्या दैनंदिन आयुष्यात चांगला फायदा होतो, असे सांगून त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. आनंद सामंत यांनी या स्पर्धेचा उद्देश सांगितला. यावेळी चंद्रशेखर सिंग यांनीही खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्पर्धा प्रमुख हेमंत पांडे यांनी केले.

ब्रीज स्पर्धेत १६ वर्षे, २१ वर्षे, २६ वर्षे आणि ३१ वर्षे असे वयोगट आहेत. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतातील विविध राज्यातून १३० खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे विविध गटामध्ये खेळाडूंची संभाव्य प्राथमिक निवड करण्यात येणार आहे. या निवड झालेल्या खेळाडूंचे तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्फत पुढील सहा महिने प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यानंतर खेळाडूंची भारतीय संघामध्ये अंतिम निवड करण्यात येणार आहे. हे निवड झालेले खेळाडू ऑगस्ट २०२६ मध्ये चीन येथे आयोजित जागतिक ब्रिज स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करतील, अशी माहिती आनंद सामंत आणि हेमंत पांडे यांनी दिली. या निवड चाचणी प्रक्रियेत आनंद सामंत आणि अनिल पाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ प्रशिक्षक संदीप ठाकराल, कौस्तुभ बेंद्रे आणि सहकारी कार्यरत आहेत. या स्पर्धेची तांत्रिक बाजू तांत्रिक प्रमुख विश्वनाथ बेडिया आणि चेतन रावल हे सांभाळत आहेत.

तीन दिवस सुरु असणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध गटांच्या आय. एम. पी. पेयर्स या प्रकारचे सामने खेळविले जात आहेत. स्पर्धेत मॅच पाईंट पेयर्स तसेच सांघिक स्पर्धाही होतील, अशी माहिती विश्वनाथ बेडिया आणि चेतन रावल यांनी दिली.