नाशिक - गळती रोखण्यासाठी शहरात ठाकरे गट सक्रिय झाला आहे. शक्ती प्रदर्शनासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत एप्रिलअखेर महिला मेळावा घेण्याचे नियोजन होत आहे. या मेळाव्यासाठी रश्मी ठाकरे या उपस्थित राहतील की नाही, हे निश्चित नसले तरी मेळावा दिमाखदार होण्यासाठी ठाकरे गटाकडून विभागनिहाय बैठकांवर भर देण्यात येत आहे. इतर पक्षातील कार्यकर्त्यांना पक्ष प्रवेशास प्राधान्य देण्यात येत आहे. राज्यात शिंदे -फडणवीस सरकार आल्यापासून शहरातही ठाकरे गटात पडझड झाली. विशेष म्हणजे ठाकरे गट महिला आघाडीच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केल्यावर अधिक हानी पोहचण्याआधीच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. पडझड रोखण्यासाठी थेट रश्मी ठाकरे यांनाच मैदानात उतरविण्याचे नियोजन करण्यात येत असून त्यांच्या उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हेही वाचा >>> मनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांचा राजीनामा; पक्षांतर्गत अस्वस्थता चव्हाट्यावर मेळाव्यात रश्मी ठाकरे यांचा सहभाग अद्याप अनिश्चित असताना मेळावा भव्यदिव्य होण्यासाठी ठाकरे गटातील वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांकडून बैठकांचे सत्र राबविले जात आहे. बुधवारी शालिमार येथे पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत नाशिक पश्चिम मतदार संघातील शेकडो महिलांनी ठाकरे गटात प्रवेश केला. महिला आघाडीच्या पदाधिकारी श्रृती नाईक आणि अलका गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, महेश बडवे, सचिन मराठे, मध्य नाशिक विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे आदी उपस्थित होते. महिला आघाडीच्या पदाधिकारी प्रेमलता जुन्नरे, मंदाताई दातीर आदींच्या हस्ते शिवबंधन बांधून या सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.