नाशिक : शासनाकडून मंजूर झालेल्या वैद्यकीय बिलाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सातपूर येथील राज्य कामगार विमा योजना (ईएसआय) रुग्णालयातील वरिष्ठ सहाय्यकाला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. रामचंद्र माकरे याला भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७ अन्वये सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड, तर कलम १३ (२) अन्वये एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
तक्रारदार यांचे शासनाकडील वैद्यकीय बिल मंजूर झाले होते. त्याची रक्कम बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात माकरे याने १६ सप्टेंबर २०१४ रोजी शासकीय पंचासमक्ष तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर दोन हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदाराकडून राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील वैद्यकीय खर्च प्रतिकृती कक्षासमोरील हॉलमध्ये दोन हजार रुपये स्वीकारताना माकरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात १६ सप्टेंबर २०१४ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ७, १३(१)(ड) व १३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण करून ९ एप्रिल २०१५ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित खारकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने माकरे याला दोषी ठरवून वरील शिक्षा सुनावली. भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अंतर्गत सहा महिने कारावास व एक हजार रुपये दंड आणि कलम कलम १३ (२) अन्वये एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. एक हजार रुपयांचा दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास भोगावा लागणार आहे.
या खटल्यात लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी आणि कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे यांनी कामकाज पाहिले. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे व सचिन गोरवाडकर यांनी बाजू मांडली.
लाच मागितल्यास १०६४ वर तक्रार करा
शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी निर्भीडपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी टोल फ्री १०६४ क्रमांकावर संपर्क साधता येईल. नाशिक कार्यालयासाठी ०२५३-२५७५६२८, २५७८२३० हे दूरध्वनी क्रमांक तसेच ९५४५६५१०६४ हा व्हॉट्सअँप क्रमांक उपलब्ध आहे.
