नाशिक : ‘लोकल टू ग्लोबल’ या संकल्पनेच्या माध्यमातून नाशिकला जागतिक दर्जाचे उत्पादन व निर्यात केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी उद्योग, शासन आणि वित्तीय संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. उद्योगांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादन, आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके, नावीन्य आणि परस्पर सहकार्यावर भर दिल्यास नाशिकच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत मोठी संधी मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा प्रशासन तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या संयुक्त विद्यमाने अंबड एमआयडीसी येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये आयोजित ‘निर्यात जनजागृती शिबिर व ई-कॉमर्स एक्स्पोर्ट समिट’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाचे (डीजीएफटी) अतिरिक्त महासंचालक आर. के. मिश्रा, उपमहासंचालक अश्वीन गोलपकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उपायुक्त चेतन पाटील, केपीएमजीचे प्रीतम मोहन सिंग, निमाचे प्रतिनिधी मनीष रावल तसेच उद्योजक, एमएसएमई प्रतिनिधी, स्टार्टअप्स, महिला उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि निर्यातदार उपस्थित होते.

उद्योगांनी केवळ उत्पादनक्षमतेवर भर न देता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा सखोल अभ्यास करून उत्पादनाची दिशा निश्चित करावी, असे आवाहन प्रसाद यांनी केले. ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी स्थानिक कच्चा माल, मूल्यवर्धन आणि स्थानिकीकरणाला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. निर्यातक्षम उत्पादनांनी आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके पूर्ण करून आवश्यक प्रमाणपत्रे मिळविण्यावरही त्यांनी भर दिला. उद्योगांना व्यवसाय सुलभता, आवश्यक परवानग्या, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे आणि विविध शासकीय प्रक्रियांमध्ये आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक ड्राय पोर्टचा अधिक प्रभावी वापर करून निर्यात खर्च कमी करण्यासह जागतिक बाजारपेठेशी थेट जोडणी मजबूत करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा प्रशासन आणि डीजीएफटीच्या संयुक्त विद्यमाने लवकरच ‘बायर-सेलर मीट’ आयोजित करण्यात येणार असून, त्यातून उद्योजकांना देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रशिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर, निर्यात वित्त, बँकिंग सुविधा आणि कर विषयक मार्गदर्शनाद्वारे उद्योगांची क्षमता वाढविण्यावर विशेष भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

डीजीएफटीचे अतिरिक्त महासंचालक आर. के. मिश्रा यांनी या शिबिराचा उद्देश नव्या उद्योजकांना आणि विद्यमान निर्यातदारांना एकत्र आणून परस्पर सहकार्याचे मजबूत व्यासपीठ निर्माण करणे हा असल्याचे सांगितले. निर्यात क्षेत्रात यश मिळविण्यासाठी माहितीची देवाणघेवाण, सहकार्य आणि जागतिक बाजारपेठेचे ज्ञान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

विविध विषयांवर मार्गदर्शन

शिबिरात आयईसी नोंदणी, परराष्ट्र व्यापार धोरण-२०२३, निर्यात प्रोत्साहन योजना, निर्यात पतविमा, निर्यात वित्त, कृषी व प्रक्रिया उद्योगातील निर्यातीच्या संधी, कर्ज हमी योजना यांसह विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच इंडिया पोस्ट, डीएचएल, वॉलमार्ट, फेडएक्स आणि इतर ई-कॉमर्स भागीदारांनी निर्यात प्रक्रियेतील सुविधा व संधींची माहिती दिली.