नाशिक – जादूटोण्याची भीती दाखवून महिलेवर बलात्कार करुन धमकावित पीडितेशी लग्न करणाऱ्या तसेच भोंदूगिरीला विरोध केल्याने पोडितेस मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या निफाड तालुक्यातील भोंदूबाबाविरुध्द महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने पीडितेने तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बाबाला सायखेडा पोलिसांनी अटक केली आहे.
पंचवटीतील महिला चहाचे दुकान चालवत होती. व्यवसायात भरभराट व्हावी म्हणून काही जणांनी तिचा दारणा सांगवी येथील बाबाशी ओळख करुन दिली. बाबाने तांदूळ, कडक उद जाळून त्याची दुकानात धुनी दिली. पाचोळ्याची, जडीबुटीची पूड पाकिटाiत ठेवल्याने व्यवसायाची भरभराट होईल, असे बाबाने महिलेला सांगितले. तिच्याकडून तीन हजार रुपये घेतले. काही दिवसांनंतर आपल्याशी शारीरिक संबंध न ठेवल्यास जादूटोणा करून मारून टाकेल, अशी धमकी देत तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. नंतर तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. पीडिता भोंदूगिरीला विरोध करु लागल्यावर बाबा लाथाबुक्क्यांनी मारणे, धमकी देणे असे प्रकार करु लागला. दोन ते तीन वर्ष हा अमानुष छळ पीडितेने सहन केला.
तीन-चार दिवसांपूर्वी बाबाने त्याच्या एक वर्षाच्या मुलाचा आणि पीडितेचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तिने कसेबसे स्वतःला वाचवले. आणि नातेवाईकांकडे निघून गेली. नातेवाईकांसह पीडित महिलेने महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. कार्यकर्त्यांनी पीडितेला घेऊन नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. सर्व प्रकार ऐकल्यानंतर सखोल तपास करून संबंधित बाबाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी सायखेडा पोलिसांना दिले..त्यानुसार जादूटोणाविरोधी कायदा तसेच अन्य कायद्यानुसार सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी बाबाला बेड्या ठोकल्या आहेत.
भोंदूने आजपर्यंत अनेक व्यक्तींना, कुटुंबांना फसवून त्यांचे शोषण केले असण्याचा संशय महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. अशा फसवणूक व शोषण झालेल्या पीडितांनी पोलिसांमध्ये तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे,जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, प्रल्हाद मिस्त्री, कृष्णा चांदगुडे आदींनी केले आहे.
नाशिक येथील भोंदु बाबा अशोक खरात याच्यावर लैंगिक शोषण, आर्थिक फसवणुक, खंडणी यासह अन्य गंभीर गुन्हे दाखल केल्यानंतर अंधश्रध्दे मुळे पिडीतांना पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळाली. या मुळे अनेकांनी भोंदुबाबा या विरूध्द आवाज उठवला गेला. नाशिक मध्ये गणेश बाबा जगताप याच्या विरूध्द ही गुन्हा दाखल केला. राज्यात ६० हून अधिक भोंदुबाबा विरूध्द गुन्हा दाखल केला. तसेच या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
