नाशिक – लॉजिस्टिक व्यवसाय सुरू करण्यासाठी अवतार पूजेच्या नावाखाली २१ देशांची भ्रमंती करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातने व्यापारी व व्यावसायिकांची वेगवेगळ्या पद्धतीने लुबाडणूक केली आहे. व्यापाऱ्याच्या फसवणूकप्रकरणी आता नवीन गुन्हा दाखल झाला आहे.

अहिल्यानगर येथील एका व्यापाऱ्याला मंत्रांनी भारलेला पुष्कराज रत्न व हिऱ्यासोबत सोन्याच्या अंगठ्या देण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने त्याच्याकडील २० ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या काढून घेतल्या आणि त्याबदल्यात तांब्याच्या अंगठ्या सोपविल्या. ज्या पुष्कराज रत्नाची किंमत बाजारात अडीच हजार रुपये आहे, ते प्रत्येकी ७५ हजार रुपयांना विकून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

​महिलांचे लैंगिक शोषण, राजकीय नेतेमंडळींचे भविष्यकथन, अवतार पूजा, मंत्राधारित रत्न व हिरे देणे अशी स्वयंघोषित ‘कॅप्टन’ खरातची अनेक कारस्थाने समोर येत आहेत. व्यवसायात अडचणीत सापडलेल्या आणि नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांना त्याने लुबाडले आहे. या संदर्भात अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील एका कापड व्यापाऱ्याने तक्रार दिली आहे.

व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी तो पत्नीसह डिसेंबर २०२२ मध्ये भोंदूबाबाकडे आला होता. यावेळी भोंदूबाबाने त्याच्या पत्नीला मी कृष्णाचा अवतार असून तुम्हाला मंत्राने भारून पुष्कराज रत्न व हिरा देतो, ते रत्न व हिरा सोन्याच्या अंगठीतच घालावा लागेल. यातून दिव्य शक्ती प्राप्त होऊन व्यवसायात अनेक पटींनी भरभराट होईल, अशा भूलथापा दिल्या. एका पुष्कराज रत्नाची किंमत प्रत्येकी ७५ हजार रुपये सांगितली. पती-पत्नीकडील सोन्याच्या तीन अंगठ्या काढून घेतल्या आणि पुष्कराज खड्यापोटी आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपये उकळले.

​पाच ते सहा दिवसांनी भोंदूबाबा खरातच्या शहरातील कार्यालयातून तक्रारदाराला एका अंगठीत पुष्कराज, दुसऱ्या अंगठीत हिरा आणि पत्नीसाठी असलेल्या अंगठीत पुष्कराज दिला गेला. यावेळी भोंदूबाबाने धनादेशाद्वारे उर्वरित एक लाख ६२ हजार रुपये स्वीकारण्यास नकार देत ती रक्कम रोख स्वरूपात घेतली. भोंदूबाबाचे कारनामे समजल्यानंतर या व्यापाऱ्याने स्वतःकडील अंगठ्या, रत्न व खड्यांची पडताळणी केल्यावर धक्कादायक बाब समोर आली.

भोंदूबाबाने दिलेल्या दोन पुष्कराज खड्यांची किंमत बाजारात केवळ पाच हजार रुपये होती. तसेच या अंगठ्या तांब्याच्या असल्याचे लक्षात आल्यावर संबंधिताने पोलिसांकडे धाव घेतली. २० ग्रॅम सोन्याच्या अंगठ्यांचा अपहार आणि पिवळ्या धातूत बनावट पुष्कराज व खडे टाकून दोन लाख ६२ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरातविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.