नाशिक – भोंदूबाबा अशोक खरातविरोधात तक्रारींचे सत्र कायम असून महिलेवर अत्याचार आणि व्यापाऱ्याची फसवणूक असे दोन नवीन गुन्हे दाखल झाले आहेत. कौटुंबिक कलहामुळे वेगळे राहणाऱ्या पती-पत्नीला एकत्र आणून विश्वास संपादन करीत भोंदूबाबा खरातने नंतर संबंधित विवाहितेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

​अंगात दैवी शक्ती आहे, श्रीकृष्णाचा अवतार असल्याचे सांगून भोंदूबाबा खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत लैंगिक शोषण प्रकरणी आठ तर, फसवणूक व खंडणी प्रकरणी दोन असे एकूण गुन्ह्यांची संख्या १० झाली आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) पीडित महिलांना विश्वासात घेतल्यामुळे त्याही तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत.

कौटुंबिक कलहामुळे वेगळे राहणारे पती-पत्नी नातेवाईकांच्या आग्रहामुळे भोंदूबाबा खरातकडे सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशानेश्वर मंदिरात गेले होते. खरातच्या सल्ल्यानुसार दोघे एकत्र राहू लागले. त्यांचा विश्वास बसला. पुढे मार्च २०२२ मध्ये हे दाम्पत्य खरातला भेटण्यासाठी ‘ओकस प्रॉपर्टी’ या त्याच्या कार्यालयात गेले. यावेळी भोंदूबाबाने त्यांना बरीच माहिती विचारली. शनिवारी लग्न केल्यामुळे तुमच्यात वाद होत असल्याचे त्याने सांगितले होते. शेतात कोणती पिके घ्यावी, अशी विचारणा केल्यावर भोंदूबाबाने कमी मेहनतीत जमेल, अशी पिके घेण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांना खरातने प्रसाद म्हणून नारळ पाणी व काहीतरी सरबत दिले होते.

२०२२ ते २०२४ या काळात सहा ते सात वेळा हे दाम्पत्य खरातला भेटण्यासाठी कार्यालयात गेले होते. ​याच दरम्यान ऑगस्ट २०२४ मध्ये पीडिता पतीसह खरातला भेटण्यासाठी कार्यालयात आली असता त्याने पतीला बाहेर जाण्यास सांगितले. महिलेला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास दिले. डोक्यावर तांब्याचे भांडे ठेवून मंत्र म्हणायला सांगितले.

मी महादेवाचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, असे सांगून खरातने गुंगीकारक पदार्थ पिण्यास देऊन अत्याचार केला. पीडितेने विरोध केला आणि याबद्दल कोणाला काही सांगितल्यास आपल्याकडील दैवी शक्तीने मुलांना मारून टाकेल, तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल, अशी धमकी त्याने दिली होती. यामुळे पीडितेने घाबरून याबद्दल वाच्यता केली नव्हती. ऑगस्ट ते डिसेंबर २०२४ या काळात खरातने अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, ​संशयित खरातच्या पोलीस कोठडीची मुदत रविवारी संपत आहे. दाखल होणारे गुन्हे आणि तपासात समोर आलेल्या बाबी या पार्श्वभूमीवर, सरकारी पक्षातर्फे खरातच्या पोलीस कोठडीत पुन्हा वाढ करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.