नाशिक – महिला लैंगिक शोषणाच्या दोन गुन्ह्यात भोंदूबाबा अशोक खरात आतापर्यंत २१ दिवस पोलीस कोठडीत होता. अंकशास्त्र आणि ईशानेश्वर मंदिराच्या माध्यमातून खरातने दिग्गज राजकीय नेते, बडे शासकीय व पोलीस अधिकारी आणि उच्चभ्रू वर्गातील अनेकांना भुलवले. महिनाभरापूर्वी अलिशान आयुष्य जगणारा खरात काही काळ पोलीस कोठडीत राहिल्यानंतर सुतासारखा सरळ झाला आहे. आपल्या भूलथापा लोकांना कशा पटल्या, असा प्रश्न देखील आता खुद्द त्याला पडला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीतील अधिकाऱ्यांसमोर त्याने ते बोलूनही दाखवले.
महिला अत्याचार प्रकरणी दाखल दुसऱ्या गुन्ह्यात खरातला न्यायालयीन कोठडी मिळाली. आता तिसऱ्या गुन्ह्यात त्याला अटक केली जाणार आहे. सात महिन्याच्या गर्भवतीवर अत्याचार केल्या प्रकरणी त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले जाईल. पीडितेच्या पतीने या संदर्भात तक्रार दिली आहे. भोंदूबाबाने त्याला सातव्या महिन्यात वाईट व दृष्ट शक्तींपासून गरोदर स्त्रीला खूप सांभाळावे लागते. मी एक विधी करेल, ज्यामुळे तुझ्या पत्नीवर दृष्ट शक्तींचा परिणाम होणार नाही आणि तिचे बाळंतपण सुरळीत होईल.
तुझ्या बायकोला मुलगाच होण्यासाठी एक विधी करेल, अशा भुलथापा दिल्या होत्या. तक्रारदार पत्नीला घेऊन आला असता भोंदूबाबाने तिच्यावर अत्याचार केले. ही बाब पीडितेने सांगितल्यावर तक्रारदार पतीने भोंदूबाबाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. खरात केबीनमध्ये काय करतो, हे बघण्यासाठी त्याने मित्राच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. केबीनमधील छायाचित्रण त्याने नंतर पेनड्राईव्हमध्ये काढून घेतले. अनेक महिला व मुलींबरोबर खरात गुंगीकारक पदार्थ व द्रव्य देऊन त्यांना मोहित करून अत्याचार करीत होता. खरातची दुष्कृत्ये उघड करण्यात सीसीटीव्हीच्या चित्रफिती महत्वाच्या ठरल्या. दोन पेन ड्राईव्हमधील या चित्रफिती तपास यंत्रणेकडे असल्याचे सांगितले जाते.
एसआयटीच्या तपासात संशयित खरातने पीडिता आणि त्यांच्या कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन, भीती दाखवून, खडे, चिंचुके, रुद्राक्ष, पूजा, विधी आदी माध्यमातून पैसे उकळले, असे निष्पन्न झाले. अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून, कुटुंबियांच्या मृत्युची भीती दाखवून महिलांचे त्याने लैंगिक शोषण केले. सिन्नरच्या ईशानेश्वर मंदिरात अंधारात हातचलाखीने दैवी शक्ती असल्याचे भासवून अंधश्रध्दा पसरवण्याचे काम केले. ठोकताळ्याच्या आधारे तो काहीतरी सांगायचा. यातील काही गोष्टी खऱ्या निघायच्या. मग अशा भक्तांकडून त्याचा प्रचार झाला. त्याच्याकडे येणाऱ्यांमध्ये संपर्कातून (रेफरन्सने) येणाऱ्यांचा समावेश होता. बनावट खडे महागड्या किंमतीला विकून लुबाडल्याची माहिती कुणाकडून दिली गेली तरी बाबाला समजेल म्हणून भक्तांनी मौन बाळगले होते. पोलीस कोठडीत काही दिवस काढल्यानंतर भोंदूबाबा खरातने ‘आपण जे सांगत होतो ते सर्व थोतांड होते, लोकांना कसे पटले, हेच मला समजत नाही, असे तपासादरम्यान म्हटल्याचे एसआयटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडुून सांगण्यात आले.
