नाशिक – आयएसओ मानांकन, जर्मनी व दिल्लीतील प्रदर्शनात सहभाग घेतल्याचे चित्र रंगवत तीन संशयितांनी नाशिक शहरात भाडेतत्त्वावरील जागेत कार्यालय थाटले. ही जागा आपल्या मालकीची असल्याच्या भूलथापा देत गुजरात आणि उत्तराखंड राज्यांतील औषधनिर्मिती कंपन्यांना भल्यामोठ्या ऑर्डर दिल्या. त्यापोटी पुढील तीन महिन्यांच्या तारखांचे धनादेश देऊन नव्याने ऑर्डर दिल्या आणि पहिल्या ऑर्डरचा धनादेश बँकेत वटण्यापूर्वीच संशयितांनी कार्यालयाला टाळे ठोकून पलायन केले. यात गुजरात व उत्तराखंडमधील कंपन्यांची तब्बल एक कोटी ७३ लाख ७० हजार ३४३ रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

औषधनिर्मिती कंपन्यांना फसवण्यासाठी संशयितांनी अवलंबलेली पद्धत चक्रावून टाकणारी ठरली. गुजरात येथील प्लाक्षा इंडस्ट्रीज आणि उत्तराखंड येथील जीएनपाल स्पेशालिटी मॉलिक्युल्स एलएलपी या दोन कंपन्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालाचा संशयितांनी अपहार केला. या संदर्भात प्लाक्षा इंडस्ट्रीजचे विक्री अधिकारी विनयकुमार ओमप्रकाश यांनी तक्रार दिली. त्यावरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात तुषार (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही), अथर्व भिकू वाघमारे (गणराज अपार्टमेंट, कोपरखैरणे, नवी मुंबई) आणि सचिन मोरे (रमा ओनेक्स, नवघर गाव, ठाणे) यांच्याविरुद्ध एक कोटी ७३ लाख ७० हजार ३४३ रुपये किमतीच्या औषधांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑर्डरच्या बदल्यात धनादेश…

संशयित तुषार आणि न्युऑन लाईफसायन्स या नावाने औषध परवाना असलेले संशयित अथर्व वाघमारे व सचिन मोरे यांनी शहरातील डॉक्टर हाऊस येथील व्यवसायाची जागा भाडेतत्त्वावर असतानाही ती स्वतःच्या मालकीची असल्याची खोटी माहिती दिली. त्यांच्या आस्थापनाला आयएसओ प्रमाणपत्र असल्याचे सांगून ई-मेलद्वारे बनावट प्रमाणपत्र पाठवले. आस्थापनाच्या संकेतस्थळावरही हे बनावट प्रमाणपत्र प्रदर्शित करण्यात आले. त्यांच्या फर्मने जर्मनी व नवी दिल्लीतील प्रदर्शनात सहभाग घेतल्याची खोटी माहिती देत विश्वास संपादन केला. त्यानंतर गुजरात व उत्तराखंड येथील दोन्ही औषध कंपन्यांना वेगवेगळ्या औषधांच्या ऑर्डर देऊन, त्यांची किंमत अदा करण्यासाठी पुढील तीन महिन्यांच्या तारखांचे धनादेश दिले. हे तीन महिने पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा आणखी ऑर्डर देऊन त्यापुढील तीन महिन्यांच्या तारखांचे धनादेश देण्यात आले. मात्र, पहिल्या ऑर्डरचा धनादेश बँकेत जमा होण्यापूर्वीच संशयितांनी कार्यालय बंद करून पलायन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संशयितांनी दिलेले एकही धनादेश वटले नाहीत. यात प्लाक्षा इंडस्ट्रीजचे ७७ लाख ५९ हजार ११६ रुपये आणि सहयोगी जीएनपालचे ९६ लाख ११ हजार २२७ रुपये, अशा एकूण एक कोटी ७३ लाख ७० हजार ३४३ रुपयांच्या मालाचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.