नाशिक – गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षात ऑक्टोबर २०२५ अखेर जिल्ह्यातील ८० शेतकरी आणि त्यांच्या वारसांना एक कोटी ५९ लाख रुपयांचे सानुग्रह प्रदान करण्यात आले.
याबाबतची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातामुळे त्यांना अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबाला शासनाच्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास रूपये दोन लाख, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात/ पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास दोन लाख रुपये आणि अपघातामुळे एक डोळा, एक हात/पाय कायमस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपयांचे सहाय्य मिळते.
योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्याचा रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू व खून, उंचावरून पडून अपघात, सर्पदंश व विंचूदंश, जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल यासह अन्य कोणतेही अपघात ग्राह्य धरले जातात. या योजनेत नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरातील रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी जवळच्या लाभधारकाकडून खून इत्यादी बाबीचा समावेश नाही.
चालू वर्षात ऑक्टोबर २०२५ अखेर अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे २०५ आणि अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांचे पाच असे एकूण २४० प्रस्तावांसाठी चार कोटी १० लाखांचे रूपये मंजूर आहेत. यापैकी अपघाती मृत्यू झालेल्या ७८ शेतकरी व अपंगत्व आलेले दोन शेतकरी याप्रमाणे एकूण ८० शेतकऱ्यांना एक कोटी ५९ लाख सानुग्रह अनुदान वारस आणि प्रत्यक्ष लाभार्थ्याच्या खाती वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित १६० प्रस्तावांसाठी कृषी विभागाने शासनाकडे निधीची मागणी केली आहे. निधी प्राप्त होताच मदतीची रक्कम वारस व लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी म्हटले आहे.
