नाशिक : अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहआयुक्त (अन्न) मंगेश माने आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) संदीप देवरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूच्या साठवणूक आणि वाहतुकीविरोधात तीन ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सहा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हरसूल पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलमान बाबाखान शहा याच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला. या कारवाईत १ लाख ८ हजार ६६ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव येथील रमजानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत साजिद अख्तर मोहम्मद मुस्तफा अन्सारी याच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा आणि वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. या कारवाईत २ लाख १ हजार ८०० रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा तसेच ३ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ५ लाख १ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत योगेश सोनजे याच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५४ हजार रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्नपदार्थांचा दर्जा, अस्वच्छता किंवा भेसळीबाबत नागरिकांनी थेट mahafda.in या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. पोर्टलवरील प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी व तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी अन्न व औषध प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावरही तक्रार नोंदवावी, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले.