नाशिक – भोंदू अशोक खरात प्रकरणाचा कौशल्यपूर्ण पध्दतीने तपास लावल्याबद्दल संपूर्ण राज्यात नाशिक पोलिसांचा गौरव होत असताना आणि मुख्यमंत्र्यांकडूनही पोलीस आयुक्तांना सन्मानित करण्यात आले असताना शहरातील गुन्हेगारीचा संपूर्णपणे नायनाट अजूनही झालेला नाही. सोनसाखळी ओरबाडणे, कोयते आणि तलवारी घेऊन हल्ला करणे, वाहनांची तोडफोड करणे, असे प्रकार सुरुच आहेत.

नाशिकरोड परिसरातील जय भवानी रोड भागात सोमवारी रात्री झालेल्या गोळीबाराने नाशिक पुन्हा हादरले.अशोक खरात प्रकरणाने सध्या नाशिकची सर्वत्र चर्चा आहे. या प्रकरणाची धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत पोहचल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा योग्यरितीने तपास केल्याबद्दल नाशिक शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० दिवसांचा कृती आराखड्याबाबत शासकीय कार्यालयांमध्ये ई-प्रशासन सुधारणा आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या प्रशासकीय विभागांसाठी १५० दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. त्यात ‘नाशिक जिल्हा- कायद्याचा बालेकिल्ला उपक्रम’ राबविणाऱ्या नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयास पोलीस आयुक्तालय गटात प्रथम क्रमांक मिळाला.

याबद्दल पोलीसआयुक्त संदीप कर्णिक यांचा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. १५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात नाशिक पोलीस आयुक्तालयाने ई- गव्हर्नन्समध्ये शून्य प्रलंबितता धोरणाचा स्वीकार करीत उच्च कामगिरी केली. कायद्याचा बालेकिल्ला उपक्रमाच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण, ई ऑफिस, तक्रार निवारण व विविध निकषांद्वारे २०० पैकी १५६ गुण मिळवून नाशिक पोलीस आयुक्तालयाने राज्यात अग्रस्थान पटकावले.

एकिकडे राज्यात गौरव होत असतानाही नाशिक शहरात तलवारी, कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करणे, हाणामाऱ्या असे प्रकार सुरुच आहेत. सोमवारी रात्री नाशिकरोड परिसरातील जय भवानी रोडवर असलेल्या श्री संत सावता माळी बेकरी अँड स्वीट्सच्या दुकानावर एका हल्लेखोराने गोळीबार केल्याने नाशिकरोड हादरले.

जय भवानी रोडवर नितीन गाडेकर यांचे श्री संत सावता माळी स्वीट अँड बेकरी हे दुकान आहे. या ठिकाणी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एक हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून दुचाकीने आला. त्याने अंधाराचा फायदा घेऊन बेकरीचे व्यवस्थापक मंजूर सय्यद यांच्या कानाला बंदूक लावली. गोळी झाडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, सय्यद यांनी प्रसंगावधान राखत त्याचा हल्ला हुकवला.

या घटनेनंतर संशयित अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जयंत शिरसाट व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संबंधित घटनेची माहिती घेऊन हल्लेखोराला पकडण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यात येत आहे. हल्लेखोराने व्यवस्थापक मंजूर सय्यद यांच्यावर गोळीबार करण्याचे कारण काय, या घटनेमागे काही पूर्ववैमनस्य कारणीभूत आहे की हल्लेखोराचा लुटीचा डाव होता, याची माहिती हल्लेखोर ताब्यात आल्यावरच मिळू शकेल.