नाशिक : जिल्ह्यात कळवण ते नाशिक रस्त्यावरील कोल्हापूर फाटा येथे मोटार बंगल्याच्या भिंतीवर धडकल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. मृत आणि जखमी हे बागलाण आणि देवळा तालुक्यातील आहेत.बुधवारी रात्री ११ वाजता हा अपघात झाला. बागलाण तालुक्यातील नामपूर येथील भदाण आणि देवळा येथील मेतकर कुटुंबातील सदस्य एका धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकला मोटारीने गेले होते. तेथून बागलाण तालुक्यात परतत असताना ही घटना घडली.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार रस्त्याच्या कडेला वळली. आणि एका बंगल्याच्या भिंतीवर आदळली. यात शैला भदाण (६२), भालचंद्र भदाण , माधवी मेतकर (३२), त्रिवेणी मेतकर (चार) आणि चालक खालिद पठाण यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात उत्कर्ष मेतकरसह दोन जण जखमी झाले. मृतांमधील शैला भदाण आणि माधवी मेतकर या मायलेकी असून, त्रिवेणी ही माधवी यांची मुलगी आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
भरधाव मोटार विठोबा आहेर यांच्या बंगल्याच्या भिंतीला धडकली. यात मोटारीचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच कळवण, मानूर, कोल्हापूर फाटा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने कळवण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.