नाशिक – जिल्ह्यात तापमानात वाढ होऊ लागताच पुन्हा एकदा वणवे भडकू लागले आहेत. चार दिवसात जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात चार ठिकाणी डोंगरांना आग लागली. या आगींमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडी, झुडपे, गवताची हानी झाली. मखमलाबाद शिवारातील सुळा डोंगराच्या वन क्षेत्रातील वणव्याची तीव्रता इतकी भयानक होती की दोन मैलावरूनही सुळा डोंगराचा वणवा दिसत होता.

वणव्याची माहिती मिळताच दरी- मातोरी भागातील वृक्षमित्र भारत पिंगळे, शिवाजी भाऊ धोंडगे,स्थानिक शेतकरी शेतकरी लक्षमन लोखंडे यांनी तब्बल सहा तास कसोटीचे प्रयत्न करून अंधाऱ्या रात्री डोंगर चढून उत्तर पूर्व भागातील सुळा डोंगराचा वणवा विझवला. दरम्यान वणव्याच्या वाढत्या घटनांबाबतीत अजूनही वन पर्यावरण विभाग गंभीर नाही अशी तक्रार पर्यावरणप्रेमी यांनी केली आहे.

वनव्यवस्थापन समित्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचे वणवा मुक्ती पथक तयार करावे अशी मागणी नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था,व दरिमाता वृक्षमित्र परिवाराने केली आहे. नाशिक जिल्ह्यात दरवर्षी वणवे भडकतात. पांडवलेणी, चामारलेणी, वरसविहीर, हरसूल, पेठ तालुक्यातील गावंध परिसर, गौळवाडी, रामशेज किल्ला, दरिमाता पर्यावरण क्षेत्र, कृष्णानगर वनक्षेत्र, रोहीला परिसरातील डोंगररांगा अशा टिकाणी वणव्यांचा कायमच कहर असतो.

पेठ तालुक्यातील गावंध परिसरातील वणव्यानंतर नाशिक तालुक्यातील मखमलाबाद शिवारातील सुळा डोंगराला रात्री आग लावली. हा वणवा विझवण्यासाठी नागरिकांना सहा तासांहून अधिक वेळ लागला. त्यानंतर रविवारी रामशेज किल्ला परिसरात वणवा पेटला. या ठिकाणी वणवा विझवतांना पर्यावरणप्रेमींची दमछाक झाली. याबाबतीत वन विभागाच्या १९२६ हेल्पलाईनला सर्वाधिक फोन निसर्गमित्राकडून केले जातात.

रविवारी सायंकाळी सप्तश्रृंग गड परिसरात अहिवंतवाडीसमोरील घाटाला लागून असलेल्या डोंगराला आग लागली. त्यामुळे वनसंपतीचे नुकसान झाले. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास देवळा तालुक्यातील भावडबारी घाटातील डोंगराला आगलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदेचे नुकसान झाले. घाटाच्या पायथ्याशी राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बाजूने दुपारी लागलेली आग रात्री उशिरापर्यंत सुरु होती, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दुपारपासून उपस्थित राहून आग विझविण्याचा प्रयत्न करीत होते.

परंतु, अपुरे मनुष्यबळ आणि डोंगराच्या माथ्यावर आग गेल्याने नियंत्रण मिळविणे कठीण झाले. वणवा रोखण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे, वणव्याबाबत दक्ष राहण्यासाठी लोकजागृती, रोजगार हमी योजनेतून वणवाप्रवण क्षेत्रात जाळपट्टे उभारणी, तसेच वणवा विझवण्यासाठीचे सोपे तंत्र, जिल्हाभर वणवा मुक्ती दल तयार करता येईल, वणव्याची दाहकता कमी होईल आणि वणवा लावणारे गजाआड जातील, याअनुषंगाने काम व्हायला हवे, अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या वतीने वन व्यवस्थापकांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.