नाशिक – दरोड्याच्या तयारीत असलेल्या नोंदीतील गुन्हेगारांना जेरबंद करण्यात उपनगर पोलिसांना यश आले. या प्रकरणी चार संशयितांना अटक करुन दोन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

देवळाली गावाच्या कुस्ती मैदान परिसरात भिंतीच्या आडोशाचा फायदा घेत सार्थक अहिरे, आबा पवार, हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे आणि त्यांचे अन्य तीन साथीदार हे संशयास्पद हालचाल करताना पोलिसांना दिसले. पोलिसांची चाहुल लागताच दुचाकीवर बसून ते पळाले. हार्दिकच्या हातात धारदार शस्त्र, सार्थकच्या हातात गावठी बंदूक, पवनच्या हातात दोरी असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधाराचा फायदा घेत संशयित साठे नगर तसेच देवळाली गावाच्या गल्लीबोळातून फरार झाले. यादरम्यान सार्थकने गावठी बंदूक खिशात ठेवली असता तिच्यातून गोळी निघाली. सार्थकच्या पायाला ती लागली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बिटको रुग्णालय आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने दिलेल्या माहितीवरुन आबा पवार, हार्दिक, समीर, पवन यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी बंदूक, कोयता, नायलॉन दोरी, मिरची पूड, दोन दुचाकी असा दोन लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.