नाशिक : गणरायाला पर्यावरणस्नेही पद्धतीने निरोप देण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या मूर्ती संकलन उपक्रमाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विसर्जनाच्या दिवशी शहरातील सहाही विभागांतून तब्बल २ लाख ४९ हजार ७६ गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मूर्ती संकलनात सुमारे १० टक्के वाढ झाली. याशिवाय विविध विसर्जनस्थळांवरून १५५.०१० मेट्रिक टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा विषय ऐरणीवर आला आहे. गोदावरीसह तिच्या उपनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून गणेशमूर्ती आणि निर्माल्य संकलनाचे नियोजन केले जाते. यंदा गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात ४४ कृत्रिम तलाव, १९ नैसर्गिक विसर्जनस्थळे तसेच १८ ठिकाणी कृत्रिम आणि नैसर्गिक अशा दोन्ही प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती.विसर्जनाच्या दिवशी सहा विभागांतून एकूण २ लाख ४९ हजार ७६ मूर्ती संकलित करण्यात आल्या. सन २०२५ मध्ये २ लाख २६ हजार १७७ मूर्ती संकलित झाल्या होत्या. यंदा त्यात २२ हजार ८९९ मूर्तींची वाढ झाली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी गणेशभक्तांनी मूर्ती दान करून जलप्रदूषण टाळण्यास हातभार लावल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
या उपक्रमात महापालिकेच्या पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम आणि घनकचरा व्यवस्थापन विभागांनी समन्वयाने काम केले. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि विविध संस्थांनीही सहभाग घेतला. ‘देव द्या, देवपण घ्या’ या उपक्रमाला यंदा नाशिककरांनी मोठा प्रतिसाद दिला. या उपक्रमांतर्गत चोपडा लॉन्सजवळ सुमारे ३,८०० मूर्तींचे संकलन करण्यात आल्याची माहिती संयोजक आकाश पगार यांनी दिली.
पीओपीसह शाडूच्या मूर्तींचेही संकलन
संकलित करण्यात आलेल्या गणेशमूर्तींपैकी २ लाख ४० हजार ६३३ मूर्ती पीओपीच्या, तर ८ हजार ४४३ मूर्ती शाडू मातीच्या आहेत. पीओपीच्या मूर्तींपैकी २ लाख ४० हजार ४७९ मूर्ती सहा फुटांपेक्षा कमी आकाराच्या, तर १५४ मूर्ती सहा फुटांपेक्षा अधिक आकाराच्या आहेत.
पंचवटीत सर्वाधिक मूर्ती संकलन
पंचवटी विभागात सर्वाधिक १ लाख ४ हजार ४८० मूर्ती संकलित झाल्या. त्यापाठोपाठ नाशिकरोडमध्ये ५० हजार २८३, नवीन नाशिकमध्ये ३२ हजार ८६६, सातपूरमध्ये २४ हजार ८९५, नाशिक पश्चिममध्ये २४ हजार ६४८ आणि नाशिक पूर्वमध्ये ११ हजार ९०४ मूर्ती संकलित करण्यात आल्या.
१५५ मेट्रिक टन निर्माल्य संकलित
विविध विसर्जनस्थळांवरून एकूण १५५.०१० मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले. यात पंचवटी विभागातून सर्वाधिक ४३.८२० मेट्रिक टन निर्माल्य संकलित झाले. सिडकोत ३१.०१०, सातपूरमध्ये २८.४८०, नाशिकरोडमध्ये २४.४७०, पश्चिम विभागात १५.१३० आणि पूर्व विभागात १२.१०० मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले.
