नाशिक – पावसाअभावी जवळपास दीड महिने तळ गाठण्याच्या मार्गावर असलेले, नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण आता निम्मे म्हणजे ५० टक्के भरण्याच्या स्थितीत आहे. आंबोली परिसरात २४ तासांत १०४ मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे गंगापूरचा जलसाठा उंचावत आहे. दुसरीकडे संततधारेमुळे दारणा धरणही ७५ टक्के भरले असून त्यातून बुधवारी १८०० क्युसेकचा विसर्ग करण्यात आला. दुपारी भावली धरण तुडूंब भरून वाहू लागले. नांदुरमध्यमेश्वर धरणातूनही सायंकाळी विसर्ग करण्यात आला.

पावणेदोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होणे सुरु झाले असून जलसाठा २६.२२ टक्क्यांवर पोहोचला असला तरी आजही सहा धरणे कोरडीठाक आहेत. मुसळधार पावसाचा परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीत सरासरीपेक्षा निम्माही पाऊस झालेला नाही. तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेने काही धरणांची पातळी उंचावली. आंबोली परिसरात २४ तासात १०४ तर, त्र्यंबकेश्वरमध्ये ९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात एकाच दिवसांत ३१७ दशलक्ष घनफूट म्हणजे सात टक्के पाणी आल्याचे पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी सकाळी या धरणातील एकूण जलसाठा २३९० दशलक्ष घनफूटवर (४२.४५ टक्के) पोहोचला.

हेही वाचा – नरहरी झिरवाळ यांचा मुलगा शरद पवार गटाच्या व्यासपीठावर – वडिलांनाही परतण्याची साद

उपरोक्त भागात पावसाचा जोर कायम होता. अशीच स्थिती कायम राहिल्यास एक-दोन दिवसांत गंगापूरमध्ये निम्म्याहून अधिक जलसाठा होईल, असा अंदाज संबंधित अधिकाऱ्याने व्यक्त केला. पावसाअभावी दीड महिने गंगापूरची पातळी खालावत होती. तळाकडील पाणी उचलावे लागण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने नियोजन सुरू केले होते. पावसाळ्यात पाणी कपात करावी लागते की काय, अशी धास्ती व्यक्त केली जात असताना तीन, चार दिवसांतील पावसामुळे नाशिकवरील टंचाईचे संकट काहीसे दूर झाले. संततधारेमुळे इगतपुरी तालुक्यातील धरणातील जलसाठा उंचावण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी दुपारी साडेचार वाजता भावली तुडुंब भरून ओसंडून वाहू लागले. याच भागातील दारणा धरणात पाच हजार ३०९ दशलक्ष घनफूट म्हणजे ७५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे या धरणातून सकाळी ११०० क्युसेकने केलेला विसर्ग सायंकाळी १८७४ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. तसेच निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर धरणातून बुधवारी सायंकाळी सहा वाजता ८०७ क्युसेकने सुरु केलेला विसर्ग सात वाजता १६१४ ने वाढविण्यात आल्याने एकूण विसर्ग २४२१ क्युसेक असा करण्यात आला.

धरणसाठा २६ टक्क्यांवर

जिल्ह्यातील लहान-मोठ्या १८ धरणांमध्ये सध्या १७ हजार २१८ दशलक्ष घनफूट म्हणजे २६ टक्के जलसाठा झाला आहे. गंगापूर धरण समुहातील काश्यपीत १७ टक्के, गौतमी गोदावरी (४२ टक्के), आळंदी (सात टक्के) असा जलसाठा आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओसंडून वहात आहे. दारणा धरणात ७५ टक्के, मुकणे (२२ टक्के), भावली (१००), वालदेवी (३५), कडवा (६३) टक्के जलसाठा आहे. पालखेड धरणात १४ टक्के, करंजवण (२.२९), वाघाड (११) असा जलसाठा आहे. गिरणा खोऱ्यातील चणकापूर (नऊ टक्के), हरणबारी (१४), केळझर (आठ), गिरणा (११) पुनद (४०) टक्के जलसाठा आहे.

हेही वाचा – महायुतीतील खदखद चव्हाट्यावर, अजित पवार गटाच्या आमदाराची मंत्र्यांवर टीका

सहा धरणे कोरडीच

समाधानकारक पावसाअभावी ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, माणिकपूंज, भोजापूर व नागासाक्या ही धरणे आजही कोरडी आहेत. जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ पैकी सहा धरणे पूर्णत: कोरडीठाक आहेत. उर्वरित १८ धरणात एकूण १७ हजार २१८ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात २६ हजार ३३४ दशलक्ष घनफूट म्हणजे ४० टक्के जलसाठा होता.