नाशिक : घाटमाथा परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यांतील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा ८० टक्क्यांवर पोहोचला असून, हंगामात प्रथमच धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. जिल्ह्यातील एकूण नऊ धरणांमधून विसर्ग करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील काही भागांना मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले असून, उर्वरित भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, मागील २४ तासांत त्र्यंबकेश्वर तालुक्यात १३४.५, सुरगाणा तालुक्यात १२०.७ आणि पेठ तालुक्यात ८०.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कळवण, दिंडोरी आणि इगतपुरी भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. सुरगाणा तालुक्यात खिर्डी ते भाटी गावांना जोडणाऱ्या फरशी पुलाला भगदाड पडल्यामुळे संपर्क व्यवस्था विस्कळीत होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यात रामदास डोळे या शेतकऱ्याचा बैल वाहून गेला. धरणांतील जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत असून, अनेक धरणांमधून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून बुधवारी दुपारी १९९ क्युसेक, तर याच धरण समूहातील गौतमी गोदावरी (१,०००), कडवा (१,५५४), भावली (१,५०९), पालखेड (१,३७४), पुणेगाव (७०२), दारणा (१,१००), नांदूर मध्यमेश्वर (७,९२४) आणि चणकापूर धरणातून (७,६३०) क्युसेकने विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

जिल्ह्यातील धरणसाठा ५४ टक्क्यांवर

महिनाभर ओढ देणाऱ्या पावसाने जुलैमध्ये अनेक भागांत दमदार हजेरी  लावल्याने जिल्ह्यातील धरणसाठा ५४ टक्क्यांवर पोहोचला आहे. नाशिक जिल्ह्यातील लहान-मोठ्या २६ धरणांची एकूण संकल्पित उपयुक्त साठवण क्षमता ७० हजार ६१९ दशलक्ष घनफूट आहे. बुधवारी या धरणांमध्ये ३७ हजार ७६५ दशलक्ष घनफूट इतका जलसाठा नोंदविण्यात आला. मागील वर्षी याच सुमारास धरणसाठा ६६ टक्के होता.

पाणी कपात रद्द होण्याची चिन्हे

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण तुडुंब होण्याच्या मार्गावर असून, जलसाठा ८० टक्क्यांवर पोहोचल्यानंतर बुधवारी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नाशिकमध्ये लागू असलेली पाणी कपात मागे घेतली जाण्याची चिन्हे आहेत. मागील महिन्यापासून दर शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने पुढील एक-दोन दिवस पाणीपुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे ही कपात मागे घेण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. गेल्या शनिवारी एक दिवसासाठी पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यात आला होता. मात्र, कायमस्वरूपी पाणी कपात मागे घेण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.