नाशिक : अवघ्या सात दिवसांवर लाडक्या गणरायाचे आगमन असताना, त्यापाठोपाठ येणाऱ्या गौराईच्या स्वागताची लगबग घरोघरी सुरू झाली आहे. श्री गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन होताच ज्येष्ठागौरीच्या आगमनाची धावपळ सुरू होते. गणरायाच्या तुलनेत माहेरवाशीण म्हणून आलेली गौराई अवघ्या तीन दिवसांत मुक्काम संपवत असल्याने तिच्या सरबराईत कुठलीही कमतरता राहू नये, यासाठी महिलावर्ग कामाला लागला आहे. गौराईच्या स्वागताची तयारी मुखवटे उजळणे अर्थात रंगकामापासून होते. यंदाही जुने नाशिकसह शहरातील अन्य भागांत गौरी मुखवटे उजळण्याच्या कामाने वेग घेतला आहे.

गणेशोत्सवापाठोपाठ येणाऱ्या लाडक्या गौरींच्या आगमनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. घरगुती गणपतींबरोबरच घरोघरी पारंपरिक पद्धतीने विराजमान होणाऱ्या गौरींच्या सजावटीसाठी आणि विशेषतः मुखवटे रंगकामासाठी बाजारपेठेत लगबग सुरू झाली आहे. शहर परिसरातील जुने नाशिकसह अन्य भागांत मुखवटे रंगकामासाठी देण्यासाठी नागरिकांनी गर्दी सुरू केली आहे. जुन्या मुखवट्यांना नवा साज चढवण्यासाठी कारागिरांकडे महिलांची गर्दी वाढली असून, मूर्तिकार आणि रंगकाम करणारे कारागीर दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.

बऱ्याचदा अनेकांकडे पारंपरिक मातीचे, शाडूचे, प्लास्टर ऑफ पॅरिसचे, धातूचे किंवा फायबरचे मुखवटे असतात. काहींकडे खड्यांच्या गौराई असतात. पिढीजात आलेल्या या मुखवट्यांचे पावित्र्य जपत असताना, उत्सवकाळात त्यांचे रंगकाम महत्त्वाचे ठरते. पूर्वीच्या काळातील साध्या मुखवट्यांच्या तुलनेत आता ‘थ्रीडी’ फिनिशिंग, आकर्षक डोळे, नैसर्गिक छटा असलेले आणि टिकली-नथ यांसह डिझाइन केलेले मुखवटे महिलांच्या पसंतीस उतरत आहेत.

मुखवटे धुताना रंग निघू नये, यासाठी वॉटरप्रूफ अँक्रेलिक रंगांचा वापर वाढला आहे. तसेच पर्यावरणपूरक रंगांनाही मोठी मागणी आहे. गौरीचे डोळे, भुवया आणि पारंपरिक नथ यांचे बारकावे सुबकपणे रेखाटण्यावर कारागिरांचा विशेष भर आहे. यामध्ये जुन्या पितळी मुखवट्यांचे रंगकाम करणे आव्हानात्मक असते. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जुन्या पितळी किंवा मातीच्या मुखवट्यांचे रंग उडाले असल्यास, त्यांची डागडुजी करून त्यांना पुन्हा चमक देण्याचे काम वेगाने सुरू आहे.

याविषयी बोलताना रंगकाम करणारे शंकर सातपुते यांनी सांगितले, रंगकामाचे काम दोन ते तीन टप्प्यांत चालते. यामध्ये बफिंग मशीनमध्ये मूर्ती स्वच्छ केल्यानंतर त्यावर रंगकाम केले जाते. पुढील टप्प्यात डोळे, केस आणि अन्य नक्षीकाम करण्यात येते. या काळात एक हजारांहून अधिक मुखवटे रंगवले जातात.’

दर आकारणी कशी ?

पितळी मुखवटे रंगवताना हे मुखवटे ग्राहकांच्या श्रद्धेचा विषय असतात. ते त्या त्या व्यक्तीच्या हातात जाणे गरजेचे असल्याने त्या अनुषंगाने काळजी घेतली जाते. नागपंचमीनंतर कामाला सुरुवात होते. अगदी गौराईच्या आगमनाच्या दोन दिवस आधीपर्यंत लोकांची गर्दी राहते. गौराईच्या जोडीसाठी ५०० रुपये आणि बाळाच्या मुखवट्यासाठी २०० रुपये असे दर आकारले जातात. यानंतर वर्षभर मात्र हाती फारसे काम नसते. बफिंग यंत्राच्या आधारे तांबे-पितळेच्या भांड्यांना चमक देण्याचे काम सुरू होते. सध्या पितळ धातूचा वापर वाढला आहे.’ — लता कोळपकर, रंगकाम व्यावसायिक