नाशिक – घोटी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील सहा आरोपींना मदत करण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्यास संमती दर्शवल्याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यातील एका हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबादास निवृत्ती गोवर्धने (४२, नेमणूक घोटी पोलीस ठाणे, रा. मु. पो. सांजेगाव, इगतपुरी, नाशिक) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदाराचे नातेवाईक असलेल्या सहा जणांसह अन्य चार अशा एकूण १० जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराच्या नातेवाईक असलेल्या सहा आरोपींना मदत करण्याच्या मोबदल्यात पोलीस हवालदार अंबादास गोवर्धने याने प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची तयारी नसल्याने त्याने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
या तक्रारीच्या अनुषंगाने सापळा पथकाने पडताळणी कारवाई केली. त्या वेळी पोलीस हवालदार अंबादास गोवर्धने याने तक्रारदाराच्या सहा नातेवाईकांना गुन्ह्यात मदत करण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे एकूण ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी पंच साक्षीदारांसमक्ष केली आणि ती स्वीकारण्यास संमती दर्शवली, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटले आहे. पथकाने संशयित गोवर्धने याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी, तर पर्यवेक्षक अधिकारी म्हणून स्वप्नील राजपूत यांनी जबाबदारी सांभाळली. सापळा पथकात पोलीस हवालदार शरद हेम्बाडे आणि नितीन नेटारे यांचा समावेश होता.
नागरिकांना आवाहन
कोणत्याही शासकीय कार्यालयात शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने एखादी खासगी व्यक्ती लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तसेच ०२५३-२५७५६२८, २५७८२३० आणि व्हॉट्सॲपवरील ९५४५६५१०६४ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.
