४७ वी राज्य खो-खो १८ वर्षांआतील गटाची स्पर्धा

नाशिक : नाशिकच्या १८ वर्षांआतील मुलींच्या संघाची कर्णधार आणि मुख्य आक्र मक कौसल्या पवार अंतिम सामन्यात जखमी झाल्याने ४७ व्या महाराष्ट्र राज्य खो-खो स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. परंतु, नाशिकने प्रथमच उपविजेतेपद मिळविण्याची कामगिरी केली. शेवगाव येथे सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात उस्मानाबादविरुध्द नाशिकला एक गुण आणि तीन मिनिटे राखून पराभव स्वीकारावा लागला. उपांत्य सामन्यात नाशिकने गतवर्षीच्या उपविजेत्या पुणे संघाचा ११ विरूद्ध १२ असा एक गुण आणि तीन मिनिट राखून पराभव के ला होता.

नाशिकची वृषाली भोये स्पर्धेतील उत्कृष्ठ आक्र मक ठरली. तिला पाच हजार रुपये, चषक आणि प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. नाशिक विरूद्ध उस्मानाबाद या दोन संघात झालेला मुलींचा अंतिम सामना मध्यंतराला सात-सात अशा समान गुण संख्येवर होता. नाशिकने आपल्या पहिल्या आक्रमणात उस्मानाबादचे सात गडी बाद केले. नाशिकच्या वृषाली भोयेने जोरदार आक्रमण करत चार गडी बाद केले. तिला कौसल्या पवार, ऋतुजा सहारे, मनिषा पडेर  यांनी प्रत्येकी एक गडी बाद करुन साथ दिली. नाशिक कडून संरक्षण करतांना छोटय़ा चनीच्या सरीता दिवा हिने २.५० सेकंद, कौसल्या पवार आणि ऋतुजा सहारे यांनी प्रत्येकी १.४५ तर निशा वैजलने नाबाद १.२० मिनिटे संरक्षण केले.

सामन्याच्या शेवटच्या डावात चार मिनिटे आक्रमण झाल्यानंतर नाशिकची कर्णधार कौसल्या पवार ही खुंटय़ावर धडकल्याने जायबंदी झाली. त्यामुळे नाशिकच्या मुलींचे लक्ष विचलित झाल्याने त्याचा लाभ उस्मानाबादला झाला. त्यामुळे त्यांच्याकडून चारच गडी बाद झाले. उस्मानाबाद संघाला पाच गडी बाद  करायचे होते. ते त्यांनी सहा मिनिटात बाद केले. अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली तरी नाशिकच्या संघाने उपविजेतेपद मिळवून इतिहास रचला.

तत्पूर्वी उपउपांत्य फेरीत गत वर्षी तृतीय स्थानावर असलेल्या सांगलीविरुध्द नाशिकचा सामना झाला. विलक्षण चुरशीने खेळला गेलेला हा सामना १८-१८ असा बरोबरीत सुटला. आपल्या पहिल्या आक्रमणात नाशिकने सांगलीचे १० गडी बाद केले. ते मुख्यत्वे वृषाली भोये चार, कौसल्या पवार तीन, सोनाली पवार दोन आणि सरिता दिवा एक गडी बाद यांच्या खेळामुळे. सांगलीने नाशिकचे नऊ गडी बाद केले.

नाशिककडून सोनाली पवारने १.३०, दिदी ठाकरेने १.१० आणि ए मिनिट नाबाद, निशा वैजलने एक मिनिट बचाव के ला. मध्यंतराला नाशिककडे एका गुणाची आघाडी होती. तीच अखेर निर्णायक ठरली. या संपूर्ण सामन्यात वृषाली भोयेने एकूण नऊ गडी बाद केले. तिला दिदी ठाकरे तीन गडी, कौसल्या पवार एक गडी आणि सोनाली पवार हिने दोन गडी बाद करुन चांगली साथ दिली.

नाशिकच्या या सर्व मुली  चार वर्षांंपासून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संचालित नाशिक जिल्हा खो- खो संघटनेच्या प्रबोधिनीतील आहेत. या सर्व मुली कुळवंडी, पेठ, सुरगाणा, तोरंगण, त्रिंबकेश्वर येथील आदिवासी पाडय़ावरील आहेत.