नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा पर्वाचा प्रारंभ ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून दोन मिनिटांनी झाला. ध्वजारोहण सोहळ्यानंतर सायंकाळी रामतीर्थ परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत गोदावरी महाआरतीसह विविध उपक्रम पार पडले. गोदावरी महाआरतीची विश्वविक्रमासाठी प्रयत्न करण्यात आला. दुसरीकडे, रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि श्री गंगागोदावरी पंचकोठी तीर्थ पुरोहित संघ यांच्यातील दुफळी यानिमित्ताने समोर आली.
भक्तिसंगम सोहळ्यांतर्गत शनिवारी नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे एकाच वेळी ध्वजारोहण सोहळा पार पडला. सायंकाळी रामतीर्थ परिसरात विश्वविक्रमाची नोंद करण्याच्या उद्देशाने गोदावरी महाआरतीचे नियोजन करण्यात आले होते. मुख्य कार्यक्रमापूर्वी सायंकाळी गोदावरी आरतीचा सराव करण्यात आला. यानंतर रामकुंड परिसरात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत सहा हजारांहून अधिक जनजाती बांधवांच्या सहभागातून महा गोदा आरती झाली. दरम्यान, या आरतीची विश्वविक्रमासाठी नोंद होणार होती. मात्र, त्याबाबत अखेरच्या क्षणापर्यंत कोणतीही स्पष्टता झाली नाही. आरतीपूर्वी मान्यवरांच्या हस्ते गोदापूजन करण्यात आले.
तीन महिन्यांपासून प्रशिक्षण
महा गोदा आरतीसाठी पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, निफाड यांसह सात तालुक्यांतील ६५० गाव-पाड्यांमधून आदिवासी बांधव सहभागी होणार होते. प्रत्येक गावातून सहा पुरुष आणि चार महिला सहभागी होतील, असे नियोजन करण्यात आले होते. या सर्वांना गेल्या तीन महिन्यांपासून आरतीचे प्रशिक्षण दिले जात होते. सहभागी पुरुषांपैकी ५० वर्षांखालील पुरुषांचे प्रमाण ६० टक्के, तर महिलांचे प्रमाण ४० टक्के असल्याचे समितीकडून सांगण्यात आले. हिंदू संस्कृतीतील निसर्गपूजनाची परंपरा, आदिवासी समाजाचा गौरव, गोदावरी संवर्धन आणि सामाजिक समरसता या उद्देशांनी हा उपक्रम राबविण्यात आला.
नाशिकमध्ये भव्य गोदावरी महाआरती! राष्ट्रपतींच्या उपस्थितीत कुंभमेळा प्रारंभ, दोन संस्थांत दुफळी https://t.co/XwDXMHjflC
— chaitanya sudame (@ChaitanyaSudame) October 31, 2026
शैव आणि वैष्णवांतील वाद मिटला; पण…
नाशिक येथे झालेल्या गोदावरी महाआरतीच्या निमित्ताने शैव आणि वैष्णव पंथीय १३ आखाडे एकत्र आले. यामुळे शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या जुन्या वादावर पडदा पडला. मात्र, गोदावरी आरतीच्या मुद्द्यावरून रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि श्री गंगागोदावरी पंचकोठी तीर्थ पुरोहित संघ यांच्यातील वाद कायम असल्याचे दिसून आले. कार्यक्रमात दोन्ही संस्थांकडून दोन वेगवेगळ्या आरत्या सादर करण्यात आल्या. यामध्ये पुरोहित संघाची आरती प्रथम झाली. त्या वेळी रामतीर्थ समितीच्या कार्यकर्त्यांनीही आरती सुरू ठेवली. मात्र, रामतीर्थ सेवा समितीची आरती सुरू झाल्यानंतर पुरोहित संघाच्या कार्यकर्त्यांनी आरतीचे ताट खाली ठेवल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
