नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, गोदावरी प्रदूषणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. गोदावरी नदी पात्रातून वेगवेगळ्या ठिकाणी संकलित केलेल्या पाण्याचे नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले. पर्यावरणीय मानकांपेक्षा नदीचे पाणी अधिक प्रदूषित असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नाशिक महानगरपालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपल्या कायदेशीर पर्यावरणीय जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात महानगरपालिकेने कसूर केल्याची परिणती गोदावरी नदीच्या प्रदूषणात झाल्याचे ताशेरे मंडळाने ओढले आहेत.

कुंभमेळा पर्वास सुरूवात होत असताना गोदावरी प्रदूषण, नदीपात्रातील पक्की बांधकामे, औद्योगिक वसाहतीतून प्रक्रिया न करता सोडले जाणारे सांडपाणी, शहरातील वाहिनीचे थेट नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी अशा अनेक विषयांकडे पर्यावरणप्रेमींकडून लक्ष वेधले जात आहे. गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची तक्रार करीत पर्यावरणप्रेमींनी अवमान याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वकिलांकडून महापालिकेला नोटीस बजावल्याची माहिती दिली. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार मध्यंतरी मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अर्जदारासह गोदावरी-कपिला संगम – तपोवन, दसक परिसर, समतानगर, टाकळी क्षेत्र येथील गोदावरीतील पाण्याचे नमुने संकलित केले होते. नमुने गोळा करून त्याचे निष्कर्ष जाहीर न करण्याची कार्यपद्धती प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि महापालिकेने अवलंबल्याचा आक्षेप घेतला गेला.

या घटनाक्रमानंतर गोदा प्रदूषणावरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे समोर आले. याबाबतची माहिती याचिकाकर्ते निशिकांत पगारे आणि राजेश पंडित यांनी दिली. गोदावरी नदी व उपनद्या ही नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय ओळख आहे. नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी केवळ नोटिसा आणि पाहणीपुरते मर्यादित न राहता सांडपाणी प्रक्रिया यंत्रणांची प्रभावी अमलबजावणी, नाल्यांमधून गोदावरीत जाणाऱ्या सांडपाण्यावर नियंत्रण, नियमित पाणी तपासणी आणि दोषींवर कारवाई आवश्यक आहे, असे याचिकाकर्ते पगारे यांनी म्हटले आहे.

कर्तव्यात कसूरचा ठपका

या नमुन्याच्या विश्लेषणात निर्धारित मानकापेक्षा नदीचे पाणी अधिक दुषित आढळल्याचे प्रदूषण निमंत्रण मंडळाने नोटिसीत म्हटले आहे. नियमानुसार शहरातील सांडपाण्याचे योग्य संकलन, प्रक्रिया व विल्हेवाट सुनिश्चित करणे बंधनकारक आहे. चौकशीत महापालिकेने आपल्या पर्यावरणीय जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात कसूर केल्याचे मंडळाने नोटिसीत म्हटले आहे. या संदर्भात १५ दिवसात उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

बँक गॅरेंटी जप्त होण्याचा धोका ?

या प्रकरणी महानगरपालिकेची बँक गॅरेटी का जप्त करू नये आणि कायद्यानुसार महानगरपालिकेचा वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा खंडित करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याला योग्य निर्देश का दिले जाऊ नयेत, असेही कारणा दाखवा नोटिसीत म्हटले आहे. याबाबतची माहिती उच्च न्यायालयातील सुनावणीत मंडळाच्या वकिलांनी न्यायालयात दिल्याचे याचिकाकर्ते पगारे यांनी सांगितले.