नाशिक – गोदावरी नदीचे प्रदूषण रोखून नदीत पर्यावरणपूरक जलप्रवाह कायम राखण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि कालबद्ध पद्धतीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची नियमित तपासणी करावी, तसेच शहरातील भूजलसाठ्यांमध्ये क्रोमियम आढळलेल्या भागांतील प्रदूषणाची व्याप्ती निश्चित करून त्यावर प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात गोदावरी नदी प्रदूषण नियंत्रण समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत गोदावरी नदीतील पर्यावरणीय जलप्रवाह, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, औद्योगिक प्रदूषण, भूजलातील क्रोमियमचे प्रमाण, नदीपात्रातील पाणवेली, पूररेषेतील अनधिकृत बांधकामे तसेच पर्यावरणपूरक विकासकामांचा आढावा घेण्यात आला.
गोदावरी नदीत पर्यावरणपूरक जलप्रवाह राखण्यासाठी गंगापूर धरणातून आवश्यक पाणी सोडण्याबाबत निरी संस्थेने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने पाण्याची उपलब्धता आणि आगामी पाणी आवर्तनांचा अंदाज घ्यावा. शिफारशीनुसार आवश्यक पाणी सोडण्यासाठी पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे किंवा नाही, याबाबतची वस्तुस्थिती तपासून न्यायालयाला अहवाल सादर करावा, असे डॉ. गेडाम यांनी सुचित केले. यावेळी महापालिका, जलसंपदा, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध यंत्रणांचे प्रमुख तसेच राजेश पंडित, निशिकांत पगारे, जगबीर सिंग हे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
क्रोमियमसाठी उपाययोजना आराखडा
गोदावरी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमित तपासणी करावी. नाशिक शहरातील अंबडसह काही भागांतील बोअरवेलच्या पाण्यातही क्रोमियमचे प्रमाण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर क्रोमियम उत्सर्जित करणाऱ्या कंपन्यांची महिनाभरात शंभर टक्के तपासणी पूर्ण करावी. भूजलासह पृष्ठभागावरील जलसाठ्यांमध्ये क्रोमियम आढळलेल्या ठिकाणांची व्याप्ती निश्चित करून प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा तयार करावा. क्रोमियमसह इतर जड धातू आणि जड धातूंव्यतिरिक्त असलेल्या प्रदूषकांचीही तपासणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सांडपाण्यावर प्रक्रिया आवश्यक
गोदावरी नदी व तिच्या उपनद्यांमध्ये विविध भागांतून मिसळणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या प्रकल्पांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात. तसेच वाढत्या गरजेनुसार नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याबाबत महानगरपालिकेने कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करावा, असे डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले. बंदी असलेल्या पॉलिथिन पिशव्या व इतर प्रतिबंधित साहित्याचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करावी. गोदावरी नदीपात्रातील पाणवेली काढण्यासाठी नाशिक महानगरपालिका व जिल्हा परिषद यांनी निविदा प्रक्रिया आणि त्यासंबंधीच्या आवश्यक बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष कार्यवाही करावी, असेही डॉ. गेडाम यांनी नमूद केले.
पूररेषेतील बांधकामांचे सर्वेक्षण
गोदावरी नदीच्या निळ्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामांबाबत नाशिक महानगरपालिका व त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा. निळ्या पूररेषेची माहिती केएमएल स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा विभागाने महानगरपालिकेच्या सहकार्याने आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले.
प्रदूषणकारी साहित्याचा वापर टाळा…
रामकुंड परिसरात रामकाल पथ विकसित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाच्या पुढील टप्प्यांमध्ये आवश्यक ठिकाणी पर्यावरणपूरक तसेच नदी व जलप्रदूषण रोखण्यास उपयुक्त ठरणाऱ्या साहित्याचा वापर करावा, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले. गोदावरी नदीचे प्रदूषण नियंत्रण, जलस्रोतांचे संरक्षण आणि नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.
