नाशिक – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले असून, बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक आणि विविध मिठाई खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. शहरातील मिठाईच्या दुकानांमध्ये मोदकांच्या विविध प्रकारांना मागणी असून, सोन्या-चांदीच्या वर्खाचा वापर केलेल्या मोदकांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोन्याचे वाढलेले दर आणि उत्पादन खर्चामुळे यंदा गोल्डन मोदकांच्या किमतीत वाढ झाली आहे.
गणेशोत्सवात पारंपरिक तसेच नावीन्यपूर्ण मोदकांना मागणी वाढते. त्यामुळे मोदकांच्या २० ते २५ प्रकारांनी नाशिकची बाजारपेठ सजली आहे. बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी भक्तांकडून तळणीचे, उकडीचे, अंजीर, केसर, आंबा, मोतीचूर, खोबरा-मावा, ड्रायफ्रुट्स, पिस्ता-काजू आणि सोन्या-चांदीच्या वर्खाच्या मोदकांची खरेदी केली जात आहे. यंदा बिस्कॉफ, ब्लूबेरी आणि खसखस रोल असे काही नवीन प्रकारचे मोदकही बाजारात आहेत. सोन्या-चांदीच्या वर्खाच्या मोदकांच्या वाढलेल्या किमतीमुळे गोल्डन मोदक यंदा अधिक चर्चेत आले आहेत.
नाशिकमधील सागर स्वीट्समध्ये गणेशोत्सवानिमित्त मोदकांच्या जवळपास २५ व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पारंपरिक मोदकांबरोबरच वेगळ्या चवींचे मोदक खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे संचालक दीपक चौधरी यांनी सांगितले. येथे प्रति किलो ७५० रुपयांपासून ते २७ हजार रुपयांपर्यंतचे मोदक उपलब्ध आहेत. ड्रायफ्रुट्समधील एक किलोचा एकच मोठा मोदक उपलब्ध असून, त्याचा दर १,८४० रुपये आहे. अंजीर मोदकाचा दर १,४०० रुपये किलो आहे. सर्वांचे लक्ष वेधून घेतात ते २७ हजार रुपये किलोचे गोल्डन मोदक. सोन्याचा वर्ख असलेला एक मोदक ५४० रुपयांना मिळतो. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी जवळपास १० किलो गोल्डन मोदकांची विक्री झाल्याचे चौधरी यांनी सांगितले. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे गणेशोत्सवात या मोदकांची निर्मिती सुरू राहणार आहे.
सोन्याच्या दरात झालेली वाढ आणि मोदकावर वापरला जाणारा २४ कॅरेट सोन्याचा अस्सल वर्ख महाग झाल्याने गोल्डन मोदकांच्या किमतीत वाढ झाल्याचे चौधरी यांनी सांगितले. सोन्याच्या वर्खामुळे मोदकांना आकर्षक स्वरूप प्राप्त होत असले तरी त्यासाठी ग्राहकांना अधिक किंमत मोजावी लागत आहे.
चांदीच्या मोदकांचे दरही वाढले
सोन्याच्या मोदकांबरोबरच चांदीच्या वर्खाचा वापर केलेल्या सिल्व्हर मोदकांच्या किमतीतही वाढ झाली आहे. चांदीचे दर वाढल्याने त्याचा परिणाम या मोदकांच्या विक्री दरावर झाला आहे. चांदीचा वर्ख असलेले काजू मोदक २,००० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. पारंपरिक मोदकांपासून विविध चवींच्या मोदकांपर्यंतच्या पर्यायांमुळे गणेशोत्सवाच्या काळात मिठाईच्या दुकानांमध्ये ग्राहकांची लगबग वाढली आहे.
