नाशिक – जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करण्यात ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून वेगवेगळ्या मोहिमा सुरू आहेत. सिन्नर तालुक्यात बांधकामाच्या ठिकाणावरुन साहित्य चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली. सिन्नर वळण रस्त्यावरील मनेगाव शिवारात मंजूर शेख यांच्या मालकीच्या लोखंडी पट्ट्या, अन्य बांधकाम साहित्य चोरण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा या चोरीचा तपास करीत असतांना संशयित मोटारीने सिन्नर परिसरातील आडवा फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. सापळा रचत पोलिसांनी सुरज घेगडमल (२७, रा. झापवाडी रोड), भारत बर्डे (३१, रा. वावी वेस), संकेत बारवकर (२७, रा. गंगोत्रीनगर) यांना ताब्यात घेतले. त्यांनी सिन्नर परिसरात निऱ्हळ, मऱ्हळ, मुसळगाव या ठिकाणी बांधकामांच्या ठिकाणावरुन साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली मोटार ताब्यात घेत संशयित आणि वाहन सिन्नर पोलिसांकडे दिले.
मुंबई-आग्रा महामार्गावर विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक वाहनातून चोरी करणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. इगतपुरी पोलिसांकडील या गुन्ह्याची उकल करतांना इगतपुरी तालुक्यातील फांगुळगव्हाण गावात संशयित असल्याचे समजल्यावर सापळा रचण्यात आला. ओंकार दगडे (रा. इगतपुरी), गोरख कडू (रा. बोरटेंभे) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दारूचे काही खोके ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने संशयित आणि ७६,८०० रुपयांचा मुद्देमाल इगतपुरी पोलिसांच्या ताब्यात दिला.
मालेगाव परिसरातील सराईत गुन्हेगार आबीद अहमद (४५, रा. इस्लामपुरा) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून गावठी बंदूक ताब्यात घेण्यात आली.