महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज(सोमवार) मतदान झाले. यामध्ये औरंगाबाद, नागपूर व कोकण या शिक्षक मतदारसंघांचा आणि नाशिक व अमरावती या पदवीधर समावेश होता. सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता आले. २ फेब्रवारी रोजी या निवडणुकीचा निकाल आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या जागेवरील अपक्ष उमदेवार सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी आपल्या आगामी भूमिकेबाबत मोठं विधान केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Nashik Graduate Constituency Election : “…त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली; विजय तर अगोदरच…” सत्यजित तांबेंचं मोठं विधान!

सत्यजित तांबे म्हणाले, “मी तर अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहील. यापेक्षा जास्त कुठलीही राजकीय भाष्य मी आजच्या तारखेला करणार नाही. मागील दहा -पंधरा दिवसांत जे राजकारण झालं, ज्यातून आमच्या परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न, काही लोकांनी केला. यावर जे अर्धसत्य ठेवून एकच बाजू मांडली गेली. मी मुद्दाम यामध्ये कुठलीही प्रतिक्रिया यासाठी दिली नाही कारण, शब्दाने शब्द वाढू नये आपण ज्या पक्षामध्ये आयुष्यभर राहिलो त्या पक्षाला अजून काही लोकांसमोर बोलू नये म्हणून आम्ही खरंतर काही बोललो नाही. आमच्यावर आरोप काँग्रेसकडून नाही तर काँग्रेसमधील काही लोकांकडून झाले आहेत.”

माझी उमेदवारी ही काँग्रेस पक्षाचीच होती –

याशिवाय “माझी उमेदवारी अपक्ष नव्हती, माझी उमेदवारी ही काँग्रेस पक्षाचीच होती. मी अर्ज भरतानाही इंडियन नॅशनल काँग्रेसचाच फॉर्म भरलेला आहे. मी तीन वाजेपर्यंत फॉर्म एबी जोडू शकलो नाही, म्हणून ती उमेदवारी अपक्ष झाली. मी अपक्ष उमेदवारी दाखल केली हे जे प्रसारमाध्यमांवर दाखवलं जातय ते चुकीचं आहे.” असंही सत्यजित तांबे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

योग्य वेळ आली की बाळासाहेब थोरातांशी चर्चा करणार –

याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेणार की नाही, यावर बोलताना सत्यजित तांबेंनी सांगितल, “बाळासाहेब थोरात हे आजारी आहेत. त्यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे. ते घरात बसून राहिले अशी परिस्थिती नाही, त्यांना हालचाल करता येत नाही. त्या परिस्थितीत सहा आठवडे झाले त्यांना डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे. त्यामुळे त्यांना अजून त्रास देण्याची गरज नाही. ते आमचे कुटुंबप्रमुख आहेत, त्यामुळे योग्य वेळ आली की मी त्यांच्याशी चर्चा करेन.” अशी यावेळी सत्यजित तांबे यांनी माहिती दिली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik graduate constituency election i am an independent candidate and will remain independent satyajit tambe clarified msr
First published on: 30-01-2023 at 18:07 IST