scorecardresearch

Nashik Graduate Constituency Election : “…त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली; विजय तर अगोदरच…” सत्यजित तांबेंचं मोठं विधान!

संगमनेर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांना दिली प्रतिक्रिया; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत.

Satyajeet Tambe
(संग्रहित छायाचित्र)

Nashik Graduate Constituency Election : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज(सोमवार) मतदान सुरू आहे. यामध्ये औरंगाबाद, नागपूर व कोकण या शिक्षक मतदारसंघांचा आणि नाशिक व अमरावती या पदवीधर समावेश आहे. सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदारांना मतदान करता येणार आहे. तर २ फेब्रवारी रोजी या निवडणुकीचा निकाल आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या जागेवरील अपक्ष उमदेवार सत्यजित तांबे यांनी संगमनेर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं आहे.

हेही वाचा – “मी अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहणार; आमच्यावर आरोप काँग्रेसकडून नाही तर…” सत्यजित तांबेंनी केलं स्पष्ट!

“ही निवडणूक एकतर्फी कशी ते तुम्हाला निकालातून दिसेल. विजय अगोदरच झालेला आहे, आता फक्त उत्सुकता एवढीच आहे की मताधिक्य किती होतं. मतदान किती जास्तीत जास्त होतं, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. ” असं सत्यजित तांबेंनी म्हटलं आहे.

याचबरोबर, प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सत्यजित तांबेंनी सुरुवातीला सांगितले की, “ज्या पद्धतीने या मतदारसंघात मागील १४ वर्षे माझ्या वडिलांनी प्रतिनिधत्व केलं. एकंदरीतच या पाचही जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीचा ऋणानुबंध त्यांनी इथल्या सामान्य जनतेशी, मतदारांशी निर्माण केला. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली.”

हेही वाचा – “जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रतिमेवर चिखलफेक करायचे भाजपाचे षडयंत्र” काँग्रेस नेते सचिन सावंतांचा गंभीर आरोप!

आम्हीदेखील निवडणुकीपुरतं फक्त राजकारण करत असतो –

याशिवाय, “सगळ्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते पक्षीय भेदाभेद विसरून माझ्यासोबत आहेत. याचं कारण, आम्हीदेखील निवडणुकीपुरतं फक्त राजकारण करत असतो, निवडणुकीनंतर आमच्या परिवाराने एक पथ्यं कायम पाळलेलं आहे आणि ती परंपरा आमच्या परिवाराची आहे, की आम्ही सातत्याने सामान्य लोकांच्या कामासाठी तातडीने कामाला लागत असतो. आम्ही कधीही त्यामध्ये पक्षीय भेदाभेद ठेवत नाही आणि त्यामुळे सर्वजण प्रेमाने आमच्यासोबत काम करताना दिसतात. सगळ्याच पक्षाचे लोक,शंभऱ पेक्षा अधिक संघटनांनी मला पाठिंबा दिलेला आहे. टीडीएफ, शिक्षक भारती, अभियंते, वकील, डॉक्टर आदींच्या अनेक संघटना आहेत.” असंही ते म्हणाले.

हेही वाचा – नाना पटोलेंच्या ‘त्या’ दाव्यावर सत्यजित तांबेंचे थेट विधान; म्हणाले, “जेव्हा सत्य सांगेन तेव्हा चकित व्हाल, लवकरच…”

हे सगळं बघून माझं मन भरून येतं…-

“हे सगळं बघून माझं मन भरून येतं, की इतक्या प्रेमाने लोक आमच्या पाठिशी या पाचही जिल्ह्यांमध्ये उभे आहेत. हा मतदारसंघ अतिशय मोठा मतदारसंघ आहे. ५४ तालुक्यांचा आणि चार हजार पेक्षा जास्त गावांचा मतदारसंघ आहे. उत्तर महाराष्ट्र, खानदेश सगळा पट्टा यामध्ये येतो. या सगळ्या मतदारसंघात ज्याप्रकारे प्रतिसाद आमच्या परिवाराला लोकांनी दिलेला आहे, त्यामुळे निश्चितच त्यांच्या ऋणात राहणे मी पसंत करेन आणि आगामी काळात त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचं काम मी करेन.” असं म्हणत सत्यजित तांबे यांनी मतदारांचे आभार मानले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 14:54 IST
ताज्या बातम्या