नाशिक – महिन्यातील ते चार दिवस महिलांच्या प्रकृतीनुसार अडचणीचे ठरत असतात. त्या चार दिवसांमध्ये सुट्टी देण्यात यावी, याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. ती फेटाळण्यात आल्यानंतर त्यावर चर्चा सुरू असतांना मागील काही वर्षात रजोनिवृत्तीच्या काळातील समस्या अधिक प्रकर्षाने समोर आल्या. या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे.

महिलांसाठी महिन्यातील ते चार दिवस बऱ्याचदा त्रासदायक ठरतात. या काळात महिलांना काही वेळा जास्त रक्तस्त्राव, पोटदुखी, कंबरदुखी, झोपेचे विकार यासह अन्य काही त्रास होत असतो. मात्र या पलीकडेही रजोनिवृत्तीच्या काळात होणारा त्रास शारीरिक आणि मानसिक पातळीवर असह्य होतो. यामध्ये शरिरातील हॉर्मोन्समध्ये बदल होत असल्याने चिडचिड होणे, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा येणे यासह वजनात वाढ अशा वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागते. साधारणत: वयाच्या चाळीशीनंतर अनेक महिलांना या त्रासाला सामोरे जावे लागते.

परंतु, बऱ्याचदा महिला आपल्याला हा त्रास का होत आहे, याविषयी अंधारात असतात. या काळात योग्य आहार, व्यायाम आणि काही पुरक औषधे घेतल्यास महिलांना रजोनिवृत्तीविषयक येणाऱ्या अडचणींवर मात करता येईल. या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा पातळीवर रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. साधारणत: दीड महिन्यांपासून या उपक्रमास सुरूवात झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात दर बुधवारी हा कक्ष सुरू असून महिलांशी संवाद साधत त्यांच्या आरोग्यविषयक तसेच शारीरिक अडचणींवर चर्चा करुन त्यांचे समुपदेशन करण्यात येते तसेच आवश्यकता भासल्यास औषधोपचार होत आहे.

अनेकदा महिलांकडून रजोनिवृत्तीच्या काळात होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केले जाते. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. या अनुषंगाने या कक्षात कॅल्शियम आणि व्हिटामिन -डी कमतरतेवर उपचार, आवश्यक तपासण्या, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय याठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली. या सुविधेचा जास्तीजास्त महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू असलेल्या मेनोपाॅज क्लिनिकमध्ये ११६ महिलांनी तपासणी केली.. यामध्ये मासिक पाळी अनियमितता विषयी ५६ तक्रारी होत्या, रक्तस्त्रावसंदर्भात ३२, योनी संसर्गसाठी आठ, सांधेदुखी-कंबर दुखीच्या पाच आणि अन्य १५ आरोग्यविषयक तक्रारी होत्या. जास्तीजास्त महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा यासाठी आरोग्य विभाग शिबीर किंवा अन्य माध्यमातून प्रयत्न करीत आहे. मात्र यासाठी महिलांनी रजोनिवृत्ती काळात आपल्याला त्रास होत आहे, तो त्रास उपचाराने बरा होईल, हे समजुन घेणे गरजेचे आहे. – डॉ. निलेश पाटील (अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक)