नाशिक – जिल्ह्यातील काही भागात ढगफुटीसारखा पाऊस होण्याचा इशारा प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासन, महापालिका, पाटबंधारे विभागासह सर्व संबंधित यंत्रणा सज्ज झाल्या असून धुळे येथून राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाचे पथक (एसडीआरएफ) नाशिकमध्ये तैनात करण्यात आले आहे. या काळात दरडी किंवा दगड कोसळण्याची शक्यता असलेले काही रस्ते बंद केले जात असून संबंधित ठिकाणची वाहतूक अन्य मार्गाने वळवली जाणार आहे. 

आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी विशेष चार गुरखा वाहने प्रभावित क्षेत्रात पाठविली जातील. आपत्ती व्यवस्थापनाच्या बोट आणि अन्य सामग्री वेगवेगळ्या ठिकाणी हलविण्यात आल्या. संभाव्य आपत्तीत पहिला प्रतिसाद स्थानिक प्रशासन तर, दुसरा प्रतिसाद ‘एसआरडीएफ’चा असेल. अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवल्यास लष्कराची मदत घेण्यात येणार आहे.

नाशिकमध्ये ३०० मिलीमीटर पावसाचा इशारा मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व यंत्रणांची तातडीने बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने तयारीला वेग दिला. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी महापालिकेच्या सर्व यंत्रणांना सतर्क केले. रुग्णवाहिका, जेसीबी, पोकलेन यंत्र सामग्री मजुरांसह आपत्कालीन पथके तैनात करण्यात आली आहेत.

मध्य रेल्वेचा इगतपुरी हा मुंबईला जोडणारा मुख्य मार्ग आहे. इगतपुरी-कसारा दरम्यान मोठे बोगदे आणि पूल आहेत. या ठिकाणी विशेष दक्षता घेतली जात असून हवामानाच्या अंदाजाची रेल्वे प्रशासनाला कल्पना देऊन सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. सायखेडा, चांदोरी सारख्या भागात पूरस्थिती उद्भवल्यास आवश्यक यंत्रणा तैनात करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बंधारे फुटू नयेत म्हणून दक्षता

tनद्यांमधील पाण्याची पातळी अकस्मात वाढल्यानंतर पाण्याच्या दाबामुळे बंधारे फुटण्याची शक्यता असते. तसे होऊ नये म्हणून जिल्हा परिषद आणि लघू पाटबंधारे विभागाला प्रवाही नद्या आणि लहान बंधाऱ्यांचे दरवाजे उघडून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

गंगापूर धरणासारखे मोठे प्रकल्प पूर नियंत्रणात एकप्रकारे मदत करतात. मुख्य व मध्यम प्रकल्पांना येणाऱ्या पाण्याचा फारसा त्रास होत नाही. लहान व गाव पातळीवरील धरणांची मुख्य काळजी आहे. या धरणांचे लोखंडी दरवाजे बंद असतील तर ते तुडुंब होतात. पाण्याचा प्रवाह सुरू ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नदीच्या साधारणत: दोन मीटरच्या परिघात राहणाऱ्या नागरिकांना जनावरांसह सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाणी वाहून जाण्यात अडथळे येऊ नयेत, नाले व मार्ग स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

लष्कराची मदत कधी ?

हवामानाच्या अंदाजाची लष्कराच्या स्टेशन कमांडरला कल्पना देण्यात आली आहे. संभाव्य आपत्तीत पहिला प्रतिसाद स्थानिक प्रशासनाचा असेल. दुसरा प्रतिसाद राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाचे पथकाचा (एसडीआरएफ) असेल. अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवल्यास लष्कराची मदत घेतली जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे.