नाशिक -जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य सेवा, आपत्ती व्यवस्थापन तसेच जलसंपदा व्यवस्थापनाच्या दृष्टीने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. आरोग्य तसेच अन्य आस्थापनाच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीने स्थलांतर, गरोदर मातांसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने जिल्ह्यातील ३९७ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. यामध्ये सिन्नर तालुक्यातील ४२, नाशिक तालुक्यातील ११८, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १७९, नांदगाव तालुक्यातील ४५ आणि दिंडोरी तालुक्यातील १३ नागरिकांचा समावेश आहे.

दुर्गम आणि अतिसंवेदनशील भागांतील गरोदर महिलांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ११६ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून कार्यरत आहेत.

दरम्यान, अपेक्षित प्रसूती दिनांक पुढील दोन दिवसांत असलेल्या गरोदर मातांची विशेष खबरदारी घेत जिल्हाभरातील आरोग्य संस्थांमध्ये त्यांचे आगाऊ दाखलीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या १४१ गरोदर माता विविध आरोग्य केंद्रांमध्ये दाखल असून त्यापैकी ५९ माता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये, ३७ माता ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि महिला रुग्णालयांमध्ये, तर ४५ माता इतर उच्चस्तरीय आरोग्य संस्थांमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. आतापर्यंत ४४ मातांची सुरक्षित प्रसूती झाली आहे.

अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊ नये तसेच नदी-नाल्यांमधील पाण्याचा निचरा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील १,०२९ कोल्हापूर पध्दतीचे ) बंधारे आणि २,९९१ सिमेंट बंधारे, अशा एकूण ४,०२० लहान बंधाऱ्यांचे दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होत असून संभाव्य पूरधोका कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत.

पुढील काळात देखील जिल्हा परिषद प्रशासनामार्फत अतिवृष्टीच्या परिस्थितीवर सातत्याने नियंत्रण ठेवण्यात येत असून सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासन पूर्णपणे सतर्क असून आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि लघु पाटबंधारे विभागामार्फत समन्वयाने उपाययोजना करण्यात येत आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण, रुग्णवाहिका सेवा सज्ज ठेवणे , गरोदर मातांना आरोग्य संस्थांमध्ये दाखल करणे, तसेच बंधाऱ्यांचे दरवाजे उघडे ठेवून पाण्याचा निचरा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले.