नाशिक – नाशिक शहरात सायंकाळी एक ते दीड तास गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली. अनेक भागात चाललेल्या खोदकामांनी रस्ते चिखलमय झाले. अनेक ठिकाणी पाणी साचले. वाहनधारक घसरण्याचे प्रकार घडले. प्रमुख चौक व रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. वीज पुरवठा खंडित झाला. दोन ते तीन ठिकाणी झाडे पडली. जिल्ह्यात सिन्नर, निफाड, बागलाणसह आसपासच्या भागात गुरूवारी पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार तडाखा दिला.

सायंकाळी एक ते दीड तास कोसळलेल्या पावसाने नाशिक शहराची पुरती दैना उडाली. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्रमुख रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. या रस्त्यांसह गॅस वाहिनी व तत्सम कामांसाठी सर्वत्र खोदकाम सुरू आहे. पावसामुळे अभूतपूर्व बिकट स्थिती निर्माण झाली. खोदकामांनी अनेक रस्ते चिखलमय झाले. सखल भागात पाणी साचले. त्यामुळे सर्वत्र प्रमुख चौक व रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली. थोडे अंतर पुढे जाण्यासाठी अर्धा ते एक तास लागल्याचे वाहनधारकांनी सांगितले.

अग्निशमन दलाने चिखलमय रस्त्यांंबाबत अनेकांनी तक्रारी केल्याचे मान्य केले. अशा भागात वाहनधारक घसरत होते. ड्रीम सिटी, तपोवन चौफुलीजवळ ऑईल सांडल्याने तशीच स्थिती निर्माण झाली. पोदार शाळेजवळ आणि अन्य दोन ठिकाणी झाडे कोसळली. तिथे अग्निशमन दलाचे पथक रवाना करण्यात आल्याचे मुख्यालयाकडून सांगण्यात आले. पावसामुळे शहरातील अनेक भाग रात्री उशिरापर्यंत अंधारात होते.

अग्निशमन दल हतबल

खोदकामाच्या ठिकाणी अनेक रस्ते चिखल व मातीमय झाले. वाहने घसरली. अनेक भागात वाहतूक कोंडी झाली. या संदर्भात तक्रारी येत असल्या तरी चिखलमय रस्त्यावर काय उपाययोजना करणार, असा प्रश्न मनपाच्या अग्निशमन विभागाला पडला.

नियोजनशून्य कारभाराचा फटका

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, एकाचवेळी २९ रस्त्यांची कामे हाती घेणाऱ्या आणि अन्य मार्गांवर गॅस वाहिनी व अन्य कामांसाठी खोदकामांना दिलेल्या बेसुमार परवानग्यांचा फटका शहरवासीयांना बसला. खोदलेले रस्ते तात्पुरत्या स्वरुपात बुजविण्याची मुदत टप्प्याटप्प्याने वाढवली गेली. आजतागायत अनेक भागात खोदकाम सुरू आहे. या सर्वाची परिणती अनेक रस्ते चिखलमय होण्यात झाल्याच्या तक्रारी होत आहेत. धोकादायक झालेल्या मार्गावर अपघात होऊन काही दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका नागरिकांना सहन करावा लागल्याची भावना व्यक्त होत आहे.