नाशिक – हवामान विभागाने जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. तसेच गुजरातच्या दक्षिण भागात अतिवृष्टी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, बागलाण, कळवण या सहा तालुक्यांत शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे द्वितीय वर्ष बी. फार्मसीच्या ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा आयोजित करावी, या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केेलेल्या मागणीला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
हवामान विभागाने दिलेला इशारा आणि गुजरातच्या दक्षिण भागात सुरू असलेल्या पावसाचा जिल्ह्याच्या उत्तर भागात होणारा प्रभाव या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक पार पडली. बैठकीत विविध भागांच्या सूचना आणि अभिप्राय लक्षात घेऊन शाळांबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी दिली आहे. बुधवारी जिल्ह्यात पाऊस सुरू असून पावसाचा इशारा मिळाला. त्यामुळे पर्यटन स्थळांसह सर्व धबधब्यांजवळ रविवारपर्यंत जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. तेथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यटनस्थळी जाऊ नये. तसेच धार्मिक ठिकाणांवर गर्दी करू नये. आठवडे बाजाराबाबत स्थानिक प्राधिकरणाने निर्णय घ्यावा, असेही निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांनी म्हटले आहे.
नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे विद्यापीठाला पत्र
जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात रस्ता खचणे, दरडी कोसळणे आदी कारणांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर आणि अन्य काही मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. या परिस्थितीत त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महाविद्यालयांमध्ये बी. फार्मसीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पोहोचता आले नाही. या परिस्थितीमुळे सुमारे ३१४ विद्यार्थी प्रभावित झाले. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र पाठवत या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ‘फामॉकॉलॉजी – १’ या विषयाच्या परीक्षेला उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष पुनर्परीक्षा अथवा समतुल्य पर्यायी परीक्षा आयोजित करण्याची विनंती केली होती. विद्यापीठाने तातडीने सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवले. विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या काही अभ्यासक्रमाच्या सुरू आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात पूरस्थितीमुळे परीक्षेला न पोहोचू शकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मागवली आहे. परीक्षा होऊ न शकल्याचे कारण महाविद्यालयांनी दिल्यानंततर संबंधितांची या विषयाची फेरपरीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करता येईल, असे विद्यापीठाचे उपसंचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी म्हटले आहे.
