नाशिक : ढगफुटीसदृश पावसाचा धोका टळला असला तरी नाशिक जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. इगतपुरी, सुरगाणा, त्र्यंबकेश्वरसह घाटमाथा भागात झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले असून धरणांच्या जलसाठ्यातही वाढ झाली आहे. कसारा घाटात दरड कोसळली, कौटंबी घाटात दगडी बांध कोसळले, तर शहरात सुमारे २५ झाडे व फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. देवळा तालुक्यातील चोरचावडी धबधबा परिसरात पाण्यात बुडून १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक शाळांना बुधवारीही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

ढगफुटीचा केंद्रबिंदू त्र्यंबकेश्वर असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सर्वाधिक २०० मिलीमीटर पावसाची नोंद इगतपुरीत झाली. सुरगाणा येथे १४९, त्र्यंबकेश्वर १२५, सिन्नर ७४, पेठ ६१, दिंडोरी ५८, बागलाण ४७, निफाड ४५, तर कळवण आणि देवळा येथे प्रत्येकी ४० मिलीमीटर पाऊस झाला. नाशिक शहरात मागील २४ तासांत ८४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर सोमवारीच प्रशासन सतर्क झाले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रभर नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवले. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.

कसारा घाटात दरड, अनेक ठिकाणी नुकसान

कसारा घाटातील मुंबई-नाशिक मार्गावर दरड कोसळल्याने काही काळ एकाच मार्गिकेतून वाहतूक सुरू ठेवावी लागली. कौटंबी घाटात दगडी बांध कोसळल्याने जेसीबीच्या साहाय्याने भराव हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. पहिने-भिलमाळ रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. प्रयागतीर्थ-तळवाडे मार्ग पाण्याखाली गेला. कळवण तालुक्यात चार विहिरी खचल्या, तर त्र्यंबकेश्वरमधील मेटघर किल्ला परिसरातील २५८ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू

देवळा तालुक्यातील चोरचावाडी धबधबा परिसरातील डोहात पोहण्यासाठी गेलेल्या ऋषिकेश शशिकांत संसारे (१८, रा. वडगाव पंगू, ता. चांदवड) या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. धबधबा परिसरात जाण्यास बंदी असतानाही काही युवकांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात आहे.

शहरातील रस्त्यांची चाळण

सततच्या पावसामुळे खोदलेल्या रस्त्यांची चाळण झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पाणी साचल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. मागील २४ तासांत शहरात सुमारे २५ झाडे व फांद्या कोसळल्या. अनेक भागांत वीजपुरवठाही विस्कळीत झाला. गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुढील तीन दिवस धबधबे आणि पर्यटनस्थळे टाळा

अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे अहिल्यानगर आणि पश्चिमेकडे सूरतच्या दिशेने सरकल्याने ढगफुटीचे संकट टळले आहे. मात्र, पुढील तीन दिवस नागरिकांनी धबधबे, पर्यटनस्थळे आणि नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.