नाशिक – अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील १७ धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला. अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत काही भागांत ढगफुटीसदृश्य पावसाचा इशारा दिल्यामुळे यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने खबरदारीचा उपाय म्हणून आठ तालुक्यांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना शनिवारी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच सप्तश्रृंग गड-नांदुरी घाटमार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
शुक्रवारी कायम राहिलेल्या संततधारेमुळे शहरातील खड्डेमय रस्ते पुन्हा एकदा जलमय व चिखलमय झाले. पाणी साचल्याने अनेक प्रमुख चौक व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. सायंकाळी हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला. काही ठिकाणी अतिवृष्टी, ढगफुटीसदृश्य पाऊस तसेच नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने म्हटले आहे. त्र्यंबकेश्वर, कळवण व बागलाण या तीन तालुक्यांत ५०० मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
प्रशासनाच्या सूचनेनुसार श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टने शुक्रवारी सायंकाळी सप्तश्रृंग गड ते नांदुरी हा घाटमार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसह भाविकांसाठी बंद केल्याचे जाहीर केले. शनिवारी पाऊस व परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घाटमार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. भाविकांनी भक्तनिवासाबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
१७ धरणांमधून विसर्ग
नाशिक जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये ६० हजार २१४ दशलक्ष घनफूट जलसाठा (८६ टक्के) असून अनेक धरणे तुडुंब भरली आहेत. मुसळधार पावसामुळे या धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. गोदावरी, दारणा, मोसम, गिरणा आदी नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
पर्यटन व धार्मिक स्थळे प्रतिबंधित क्षेत्र
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ व सुरगाणा या तालुक्यांतील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या, आश्रमशाळा, खासगी शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना १ ऑगस्ट (शनिवार) रोजी सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडू नये. नदी, नाले, ओढे, धरणे, तलाव, गड-किल्ले, पूरप्रवण भाग व डोंगरउतार अशा ठिकाणी जाणे टाळावे. जिल्ह्यातील सर्व धबधबे व त्यांचा परिसर, ट्रेकिंग पॉइंट्स, नदीकाठ, पर्यटनस्थळे तसेच पूरप्रवण धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या क्षेत्रांमध्ये नागरिकांच्या प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
