नाशिक : सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील अनेक भागात संततधार सुरु असल्याने शनिवारी गंगापूर, दारणासह एकूण १० धरणांमधून विसर्ग करावा लागला. गंगापूर धरणातील विसर्ग आणि शहरात सुरू असणाऱ्या पावसाने गोदावरी नदीची पातळी पुन्हा उंचावत आहे. गोदावरीच्या पुराचा निदर्शक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पाणी आले आहे. सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि पेठ या घाटमाथ्याच्या भागात पावसाचा जोर अधिक आहे. इगतपुरी शहरात काही घरांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले.

शुक्रवारी सुरू असलेल्या संततधारेने रात्री चांगलाच जोर पकडला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह घाटमाथा भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. या भागातील नदी-नाले तुडुंब भरून वहात आहेत. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १९.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यात सर्वाधिक ४४.६ मिलिमीटर पाऊस सुरगाणा तालुक्यात झाला. त्र्यंबकेश्वर (४३.६), इगतपुरी (३३.५), पेठ (२६.३), दिंडोरी (२५.४), येवला (२३.५) मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नाशिक, बागलाण, चांदवड, निफाड, नांदगाव तालुक्यात संततधार सुरू होती. देवळा व मालेगाव तालुक्यात मात्र त्याचा जोर कमी होता.

हेही वाचा…नाशिक: पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

शनिवारी दिवसभर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू राहिल्याने गंगापूर धरणातील विसर्ग सायंकाळपर्यंत टप्प्याटप्प्याने साडेसात हजार क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. गौतमी गोदावरीतून ५१२ क्युसेकने पाणी सोडण्यात आले. याचवेळी शहर परिसरात पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदी पुन्हा दुथडी भरून वाहू लागली. गोदावरीला पुन्हा एकदा पूर येतो का, याची शहरवासीयांना उत्सुकता आहे. पावसाने शहरात काही ठिकाणी झाडे कोसळली. उपरोक्त ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. सखल भागात पाणी साचले.

दिंडोरी तालुक्यातील वाघाड धरण दुपारी तुडूंब भरले. त्यामुळे त्यातून विसर्ग सुरू झाला. अनेक तालुक्यांतील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. दारणा धरणाचा विसर्ग सायंकाळपर्यंत सुमारे १२ हजार क्युसेकवर नेण्यात आला. इगतपुरी शहरातील चार-पाच घरात पाणी शिरल्याने रहिवाश्यांना अन्यत्र हलवण्यात आले. आदल्या दिवशीही नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे भाऊसाहेब सोनवणे यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले. येवला तालुक्यातील जळगाव येथे वीज पडून गाय मरण पावली.

हेही वाचा…धुळ्यात खाणीतील पाण्यात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

विसर्गात वाढ

पावसामुळे जिल्ह्यातील तुडुंब भरलेल्या व भरण्याच्या स्थितीत असणाऱ्या धरणांमधून विसर्ग केला जात आहे. शनिवारी सायंकाळी दहा धरणांमधून पाणी सोडावे लागले. अनेक धरणांच्या विसर्गात वाढ करावी लागत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास गोदावरी, दारणा, कादवासह अनेक नद्यांना पूर येण्याची चिन्हे आहेत. सायंकाळी गंगापूर (७४१३ क्युसेक), कडवा (३३१२), दारणा (११९८६), नांदूरमध्यमेश्वर (९४६५), भावली (७०१), भाम (२१७०), वालदेवी (१०७), कडवा (१२५२), आळंदी (८०), भोजापूर (१५२४) विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.